‘मेडिकल’च्या प्रसूती विभागात डॉक्टरांची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:36 PM2019-08-07T23:36:28+5:302019-08-07T23:39:50+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्याशीही असभ्य वर्तन उपस्थित डॉक्टरांनी केले. या घटनेची शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
महागाव येथील संगीता विशाल डहाळे यांना प्रसूतीसाठी यवतमाळ रेफर करण्यात आले. रक्ताचे प्रमाण कमी असल्याने महागावातील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. असह्य वेदना होत असल्याने संगीता डहाळे यांना कुटुंबीयांनी मंगळवारी रात्री १० वाजता मेडिकलच्या प्रसूती वार्ड क्र. ३ मध्ये आणले. संगीता वेदनेने तडफडत असताना येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिच्याकडे बघितलेसुद्धा नाही. नातेवाईक असल्याने यवतमाळ जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना याची माहिती मिळाली. त्यांनी थेट शासकीय रुग्णालयातील प्रसूती वार्ड गाठला. तेथील डॉक्टरांना संगीताची प्रकृती कशी आहे याबाबत विचारणा केली. यावरून त्यांनी अतिशय उर्मट पणाचे उत्तर दिले. येथे थांबू नका, पलिकडे वार्डात जागा मिळेल तेथे झोपा, आत्ताच काही होणार नाही, असे सांगून अक्षरश: बाहेर काढले. ज्या ठिकाणी झोपण्यास सांगितले तेथे एकही बेड उपलब्ध नव्हता. जमिनीवर झोपण्यासाठी गादीही देण्यात आली नाही. याबाबत कारागृह अधीक्षक चिंतामणी यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता अश्लाघ्य शब्दाचा वापर करीत अक्षरश: हाकलून देण्यात आले.
रुग्ण खासगीत घेऊन जा असे म्हटले. मात्र त्यासोबतच रुग्णांचे फाईल देण्यास त्या डॉक्टरांनी नकार दिला. अखेर नाईलाजाने प्रचंड वेदनेने तडफडत असताना तिसऱ्या माळ्यावरुन संगीता डहाळे यांना त्यांच्या पतीने व्हील चेअरची शोधाशोध करून खाली आणले. रात्री १० वाजता आले तेव्हाही रुग्णालयात एकही कक्ष सेवक स्ट्रेचर अथवा व्हील चेअर देण्यास तयार नव्हता. या गंभीर प्रकाराने त्रस्त झालेल्या कारागृह अधीक्षक यांनी रुग्णालयाचे अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे फोनवरून तक्रार केली. मात्र त्यानंतर प्रसूती विभागातील डॉक्टरांचे वर्तन अधिकच बेजाबदारपणाचे व अपमानास्पद असल्याचे चिंतामणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या गंभीर प्रकाराची शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. चौकशी करून मंगळवारी रात्री १० वाजता प्रसूती विभागात कर्तव्यावर असणाऱ्या पाच डॉक्टरांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात किर्ती चिंतामणी यांची तक्रार आल्याचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सांगितले.
महिला डॉक्टरने दिली होती मारण्याची धमकी
मेडिकलच्या प्रसूती विभागात ग्रामीण महिलांवर सातत्याने अन्याय होतो. येथे काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने चक्क प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला हातपाय तोडून मारण्याची धमकी दिली होती. या डॉक्टरची अधिष्ठात्यांनी हकालपट्टी केली. त्यानंतर एकाच वेळी १४ महिलांना शस्त्रक्रियेच्या जागेवर संसर्ग झाला होता. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मेडिकलच्या प्रसूती विभागात महिला बळी पडत आहे. त्यानंतर आता थेट जिल्हा कारागृह अधीक्षक असलेल्या कीर्ती चिंतामणी यांनाच येथील कटू अनुभव आला आहे.