डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:13 PM2019-06-29T22:13:59+5:302019-06-29T22:14:13+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.
मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ-कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिस्तीच्या नावाने अनाठाई निर्णय लादले जातात, अशी तक्रार आहे. तर दुसरीकडे रुग्णसेवा व वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन जाग्यावर आणण्याकरिता कठोर निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे सांगून कारवाईचे समर्थन केले जाते. दिरंगाई व चूक आढळल्यास तत्काळ चौकशी नेमणे, नोटीसा बजावणे हा प्रकार सुरू आहे. अशाही स्थितीत डॉक्टरांनी आपला संयम ठेवला. मात्र गोपनीय अहवाल पाठविताना अनेकांचे गुण अर्ध्यापेक्षा कमी करण्यात आले. ही बाब जिव्हारी लागली. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला. पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्यावर कसा अन्याय होतो, याचा पाढाच वाचला. आम्ही रुग्णालय सोडल्यास पर्याय नाही, असेही सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही संयम ठेवून काम करत राहा, अशी सूचना केली. या प्रकरणात निश्चितच तोडगा काढला जाईल, असेही सांगण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बाहेर आली. सर्वच समदुखी डॉक्टर एकत्र येऊन पालकमंत्र्यांकडे दाद मागायला गेले होते. ही बैठक अतिशय गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. आता पालकमंत्री ही अडचण कशी दूर करतात, याकडे लक्ष लागले आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले ‘मेडिकल’
यवतमाळचे वैद्यकीय महाविद्यालय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १६ तालुके व दुर्गम भाग असल्याने येथे अनेक प्रकारचे रुग्ण येतात. विशेष करून विषबाधा (विषप्राशन केलेले) झालेले सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होतात. शेतकरी आत्महत्या असो किंवा फवारणीतून झालेली विषबाधा, दूषित पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे जडलेले पोटाचे आजार घेऊन रुग्ण येथे येतात. जनआधार मिळविण्यासाठी रुग्णसेवा हा एक मार्ग असल्याने मेडिकल कॉलेजमध्ये अनेक नेत्यांचा इंटरेस्ट वाढला आहे. डॉक्टरातील अंतर्गत धुसफूस ही या नेत्यांसाठी आयतीच संधी ठरणारा आहे. विधानसभा निवडणुकीमुळे याला आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत.