डाॅक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:00 AM2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:12+5:30

डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबरसेल, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, न्याय वैज्ञानिक शाळा पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना पाचारण केले.

Doctor's murder: The assailant reached Dhanki from Umarkhed in 12 minutes | डाॅक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

डाॅक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील बालरोगतज्ज्ञाची मंगळवारी सायंकाळी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून हल्लेखोर हा ढाणकी मार्गाने मराठवाड्यात पळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने उमरखेड ते ढाणकी हा प्रवास अवघ्या १२ मिनिटात केला. ४.४५ वाजता गोळीबार करून तो ढाणकीतील बारमध्ये ५.११ मिनिटांनी आढळून आला. हाच धागा पकडून त्याच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहे. तर तत्काळ आरोपीला अटक करा या मागणीसाठी डॉक्टरच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. 
डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबरसेल, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, न्याय वैज्ञानिक शाळा पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना पाचारण केले. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे दोन्ही अधिकारी रात्रभर तळठोकून होते. 
डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा मृतदेह वैद्यकीय चिकित्सेससाठी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे डॉक्टरचे नातेवाईक व समाजबांधवांनी आरोपीला अटक हेाईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. नांदेड शहरात रास्त रोको करण्याचा प्रयत्न केला. 
हत्येची सुपारी दिल्याचा संशय
मारेकऱ्याची चेहऱ्याने ओळख पटली आहे. त्याच्या एकूण हालचालीवरून तो सराईत गुन्हेगार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही हत्या सुपारी देवून तर करण्यात आली नाही ना याही दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 

हत्येचा २४ तासात छडा लावू : पोलीस अधीक्षक
- डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येचे पडसाद बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. सदस्यांनी डॉ. धर्मकारे यांच्य हत्ये संदर्भात चौकशी आणि तपासाबाबत मुद्दे उपस्थित केल्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. २४ तासांत या हत्येचा छडा लावू, असे त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

रुग्णालये बंद ठेवून उमरखेडमध्ये घटनेचा निषेध 
- डॉक्टरच्या हत्येचा निषेध म्हणून उमरखेड शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहे. केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशननेसुद्धा या बंदला पाठिंबा दिला आहे. आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पावडी यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. 
मयत डॉक्टरच्या भावाला हृदयविकाराचा झटका 
- डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येनंतर हादरलेला लहान भाऊ डॉ. बालाजी धर्मकारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 
 

 

Web Title: Doctor's murder: The assailant reached Dhanki from Umarkhed in 12 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.