प्रपोगंडा मेडिसीनच्या बाजारात मालक बनलेले डॉक्टर मालामाल
By सुरेंद्र राऊत | Published: May 9, 2024 12:43 PM2024-05-09T12:43:16+5:302024-05-09T12:44:11+5:30
भागीदारीत महिन्याला दहा कोटींची उलाढाल : स्टँडर्ड औषधांपेक्षा मोठी मार्जीन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता नवा ट्रेन्ड सुरू झाला आहे. काही डॉक्टरांनीच स्वतः औषधी कंपन्यांमध्ये भागीदारी सुरू केली आहे. त्यातही प्रपोगंडा मेडिसीन अॅन्ड डिस्ट्रिब्युशन (पीसीडी) कंपनीला अधिक पसंती दिली जात आहे. यात सर्वाधिक मार्जीन मिळत असल्याने हा खेळ सुरू आहे. महिन्याला सरासरी दहा कोटींची उलाढाल होत आहे.
वैद्यकीय क्षेत्राची व्यवसायापेक्षा सेवाभावाशी असलेली ओळख पुसत चालली आहे. यात मोठे भांडवल गुंतवावे लागते. शिवाय शिक्षणावरही मोठा खर्च होतो. अशा स्थितीतही अनेकजण केवळ रुग्णांचे हित लक्षात घेत व्यवसाय करीत आहेत. मात्र काहींना आर्थिक लालच थांबवत नाही. त्या औषधी कंपन्यांकडून भर घातली जाते. सुरुवातीला पीसीडी मेडिसीन हे अॅसिडीटी, टॉनिक, कॅल्शिअम, हेल्थ सप्लिमेंट, पेनकिलरमध्ये तयार केले जात होते. याचाच वापर रुग्णांवर होत होता. ४० ते ५० टक्क्यांची मार्जीन असल्याने याला पसंतीही दिली जाते. याचा रुग्णांवर विशेष प्रभाव पडत नव्हता. अपेक्षित परिणाम येण्यास फक्त थोडा कालावधी अधिक लागत असे. त्यामुळे हा प्रकार सहज कुणाच्याही लक्षात येत नव्हता.
आता मात्र जीवनरक्षक औषधीसुद्धा पीसीडीमधून दिली जात आहे. ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराशी संबंधित औषधी, इंजेक्शन याचा समावेश आहे. यातील बरेचशी औषधी बॅन्डेड औषधांपेक्षाही अधिक दराने विकली जात आहे. एकंदरच हा काळाबाजार फोफावला आहे.
यवतमाळात ११ जणांची भागीदारी
पीसीडी मेडिसीन कंपनीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ११ जणांनी भागीदारी घेतली आहे. सुरुवातीला केवळ तीन डॉक्टरांच्याच नावाने 'फ्युचर'चा व्यवहार केला जात होता. आता हे लोन तालुकास्तरापर्यंत पोहोचले आहे. वणीमध्येसुद्धा भागीदार तयार केले आहेत. यात दीप अग्रेसर आहे. त्याच्यासोबतच काक याने वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. संधेरीसुद्धा अनेक डॉक्टरांशी संधान साधून आहे. मार्लेची थेट मोठ्या मल्टी हॉस्पिटलमध्ये शाखा उघडली आहे. या सर्वांकडून गुंतवणूक वाढवत भांडवल जमविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.
औषधीच्या मानांकनाची अशी आहे प्रक्रिया
औषधांच्या गुणवत्तेबाबत ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया काम करते. प्रत्येक औषधांचा मोनोग्राफ ठरला आहे. रसायनाला औषध म्हणून मान्यता मिळाल्यानंतर सखोल तपासणी केली जाते. नवीन अॅलोपॅथी युनिटला मान्यता देण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टेंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन काम करते. प्रत्येक नमुन्याची तपासणी केली जाते. औषधी घटकही तपासले जातात. टॅबलेट इंजेक्शन याचा एसए केला जातो. त्यामुळे पीसीडीला गुणवत्तेत कमी लेखता येत नाही. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टरांकडून पीसीडी पेक्षा बॅन्डेड औषधच बेस्ट असे सांगितले जाते.
प्रिस्क्रिप्शनवर थेट औषधी कंपन्यांचे नाव
डॉक्टरांनी रुग्णाला औषध देताना त्याचे घटक नमूद करणे आवश्यक आहे. मात्र हे कुणीच पाळत नाही. सरळ औषधी कंपनीचे नाव लिहून दिले जाते. त्यामुळे एका डॉक्टरचे औषध दुसऱ्याकडे मिळत नाही. बरेचदा औषधी कंपनीचे नाव टाकून त्यातील घटक शोधावे लागतात. तेव्हाच दुसऱ्या दुकानात औषधी मिळते. यातूनच सर्व प्रकार सुरू आहे.