कुत्र्याचा आवाज काढणारे यंत्र ठरतेय वन्यजीवांच्या उपद्रवावर उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:22 PM2020-12-18T12:22:35+5:302020-12-18T12:23:51+5:30
Yawatmal news शेतातील उभे पीक वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त होत आहे. यावर कुत्र्याचा आवाज काढणारे यंत्र उतारा ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतातील उभे पीक वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त होत आहे. यावर कुत्र्याचा आवाज काढणारे यंत्र उतारा ठरत आहे. या यंत्राला शेतकऱ्यांकडून चांगलीच मागणी होत असून वणीच्या बाजारपेठेत हे यंत्र मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत. वणी परिसरातील शेतशिवारात रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज कानावर पडत आहेत. हे यंत्र चार्जिंग पंप व विद्युत कनेक्शनवर लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार्जिंग पंपवर लावणाऱ्या यंत्राची किंमत ३५० रूपये, तर विजेवर चालणाऱ्या यंत्राची किंमत ६५०रूपये इतकी आहे. रात्रीच्यावेळी निलगाय, रानडुक्कर हे वन्यजीव शेतात शिरून शेतातील पिकांचे नुकसान करीत आहे. मात्र रात्रीच्यावेळी शेतात जागरण करून पिकांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरते. अशाही अवस्थेत काही शेतकरी जीव धोक्यात टाकून शेतात गस्त घालतात. मात्र अनेकवेळा शेतकरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्री पिकांचे संरक्षण कसे करावे, ही समस्या शेतकऱ्यांपुढे सतत असायची. तसेच यावर उपाय म्हणून याअगोदर शेतकरी ज्या शेतात वीज कनेक्शन आहे, तेथे विद्युत करंट लावून वन्यप्राण्यांना जखमी करत होते. परंतु यात खुद्द अनेक शेतकऱ्यांनाच स्वत:चा जीव गमवावा लागला.
आता नवीन यंत्र बाजारात आल्याने व कुणाच्याही जीवाला धोका नसल्याने या यंत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या यंत्रामधून कुत्रा, वाघ व फटाक्यांचा आवाज येत असल्याने रात्रभर शेतात हा आवाज घुमत असतो. रात्रीच्यावेळी शेतशिवारात गेल्यानंतर जिकडेतिकडे भुंकण्याचाच आवाज कानी पडतो.