डोईवर सूर्य, कडेवर तान्हुलं... रस्त्यावर फिरतेय अगतिक माय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 09:04 PM2019-06-07T21:04:40+5:302019-06-07T21:05:26+5:30

गर्भार लेक-सून घरात असली, तर अवघे घर तिची काळजी घेऊ लागते. पण ‘तिच्या’ नशिबी हे प्रेम नाही आले. ती रस्त्यावर प्रसवली. तापमान ४५ अंशावर असताना आपलं तान्हुलं कडेवर घेऊन ती रस्तोरस्ती फिरतेय. कुणी तिला मदत म्हणून जवळ गेले तरी ती ‘भीक नको’ म्हणून झिडकारते.

Doivar Sun, Towers on the Ropes ... On the Road | डोईवर सूर्य, कडेवर तान्हुलं... रस्त्यावर फिरतेय अगतिक माय

डोईवर सूर्य, कडेवर तान्हुलं... रस्त्यावर फिरतेय अगतिक माय

Next
ठळक मुद्देयवतमाळकर हळहळले : पण मदत घेण्यासही तिचा नकार, महिला व बालकल्याणची चमूही हतबल

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गर्भार लेक-सून घरात असली, तर अवघे घर तिची काळजी घेऊ लागते. पण ‘तिच्या’ नशिबी हे प्रेम नाही आले. ती रस्त्यावर प्रसवली. तापमान ४५ अंशावर असताना आपलं तान्हुलं कडेवर घेऊन ती रस्तोरस्ती फिरतेय. कुणी तिला मदत म्हणून जवळ गेले तरी ती ‘भीक नको’ म्हणून झिडकारते. संवेदनशील माणसांना तिच्याकडे पाहून प्रश्न पडतो... काय असेल तिची कहाणी? उत्तर अजून तरी मिळालेले नाही. कारण ती फार काही बोलतही नाही...
पण शुक्रवारी ती जरा खुलली, किंचित बोलली. अन् पुढे आली करुण कहाणी. सकाळी ११ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ३०-३२ वर्षे वयाची ही माय लेकराला पान्हा देताना काही जणांना दिसली. अनेकांना वाटले ती विमनस्क असावी. तिची काहीतरी व्यवस्था व्हावी म्हणून लोकांनी महिला व बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले. या विभागाच्या कविता राठोड व त्यांची चमू जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचली. मात्र परिसरात कुठेही तिचा थांगपत्ता लागला नाही. शहरभर शोधाशोध करताना दुपारी ही माय बसस्थानक परिसरात फिरताना आढळली. महिला व बालकल्याणच्या कर्मचाऱ्यांनी या ‘आई’ला स्वाधारगृहात चला, किमान दवाखान्यात तरी चला म्हणून विनंती केली. मात्र तिने स्पष्ट नकार दिला. ‘माझे स्वत:चे घर आहे. पण त्यावरचे टिन उडून गेले. त्यावर टिन टाकून द्या. मी माझ्या घरातच राहायला तयार आहे’ असे काहीसे त्रोटक बोलून ती बाळासह निघून गेली.
तिचे बाळ आज किमान दोन महिन्यांचे आहे. त्याला भरउन्हात घेऊन ही आई फिरत आहे. त्यामुळे बाळाची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे महिला व बालकल्याणची चमू तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागली. अखेर शहरातीलच रंभाजी नगरात तिचा एक दूरचा नातेवाईक असल्याचे कळले. एकाच खोलीत आपले कुटुंब घेऊन तो राहतो. त्याच्या घरी गेल्यावर तो म्हणाला, ती कुणाचेही ऐकत नाही. तिचा पहिला पती मरण पावला. कळंब तालुक्यातील युवकाशी तिचा दुसरा विवाह लावून देण्यात आला. मात्र ती आता एकटीच फिरत असते. कोटंबाजवळील पिंपरीत माहेर आहे. पण आईवडील, भाऊ मरण पावले. घरही पडले. आता ती येथे फिरते, माझेही ऐकत नाही.
डोईवर सूर्याने डोळे वटारलेले, खाली जमीन प्रचंड तापलेली, त्यात ही माय कोवळा जीव कडेवर घेऊन फिरत असताना संवेदनशील यवतमाळकरांचे मन कासाविस होत आहे. मात्र कोणत्याही मदतीसाठी ही आई तयार नाही. तिच्या नातेवाईकाने सांगितलेली कहाणी ऐकून महिला व बालकल्याणच्या चमूलाही काय करावे ते सूचेनासे झाले आहे.

‘तिने’ जगासाठी मूल सोडले...‘हिने’ मुलासाठी जग सोडले
मातृत्वाची दोन रूपे सध्या यवतमाळकरांना संभ्रमात पाडणारी ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी पांढरकवडा-यवतमाळ एसटी बसमध्ये एक आई आपल्या नवजात बाळाला सोडून निघून गेली. त्या आईचा आजवर थांगपत्ता लागलेला नाही. कदाचित जगाच्या नजरेत आपली ‘इज्जत’ राखण्यासाठी तिने मूल सोडून दिले. पण शुक्रवारी यवतमाळ बसस्थानकावरच आढळलेली ही दुसरी आई मात्र अवघे जग सोडून केवळ आपल्या मुलाला काळजाशी कवटाळून फिरत आहे. पहिलीला जगाची भीती वाटली म्हणून तिने मुलाला बेवारस सोडले. तर दुसरीला मुलाची काळजी वाटली म्हणून तिने जगाला झिडकारले.

Web Title: Doivar Sun, Towers on the Ropes ... On the Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.