दात्यांनी दिले १३ हजार रक्तपिशव्यांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:07+5:30
शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी रक्त द्यावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाला महत्त्व दिले जाते. असे असले तरी अनेकदा जवळच्या नातेवाईकासाठीसुद्धा धडधाकट असलेले आप्तस्वकिय रक्तदान करण्यासाठी मागेपुढे पाहतात. समाजात अजूनही रक्तदानाबद्दल अनेक समज-गैरसमज आहे. या सर्वांवर मात करत यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या चमूने रक्तपिशव्या संकलनाचा आपलाच विक्रम निर्माण केला आहे. याची दखल राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे. यावर्षी तब्बल १३ हजार ४३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी रक्त द्यावे लागते. इतकेच नव्हेतर सिकलसेल, थायलेसिमिया आणि अॅनिमिया यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज पडते. येथील रुग्णांना शासकीय रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवींद्र राठोड यांच्यासह रक्तपेढी विभागातील संपूर्ण चमू काम करते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये जाणीव जागृतीचे काम केले जाते. थोर संतांच्या, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करावे हा नवा विचार रुजविला जात आहे.
वाढदिवस किंवा कुटुंबातील इतर कार्यक्रम या औचित्यावरही रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांनाही रक्तदान केले जाते. यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विकास येडशीकर, रक्तपेढी प्रमुख डॉ.स्रेहलता हिंगवे, डॉ.संजय खांडेकर, डॉ.नीलिमा लोढा, डॉ.हर्षल गुजर, डॉ.विशाल नरोटे यांच्यासह रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दत्ता चौरे, डॉ.राहुल राठोड, डॉ.रसिका अलोणे, डॉ.शिवाजी आत्राम यांच्यासह समाजसेवा अधीक्षक मोबीन दुंगे, आशीष खडसे, गणेश कानडे, तंत्रज्ञ संजय गवारे, देवेंद्र मानकर, रमेश आमले, मधुकर मडावी, प्रदीप वाघमारे, सचिन मेहत्रे, राहुल भोयर, प्रतीक मोटे, नीलेश पळसपगार, अधिपरिचारक केशिराज मांडवकर, परिचर रामदास आगलावे, अभय मुरकुटे, दिलीप केराम, विठ्ठल डोळस आदी प्रयत्नरत आहे.
उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची गरज
उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या व रक्तदान शिबिरांची संख्या रोडावलेली असते. अशावेळी आवश्यक रक्तसाठा असावा याकरिता जाणीवपूर्वक शिबिरांचे आयोजन करून रक्तसाठा कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व उपक्रमांतूनच वर्षभरात १२६ ऐच्छिक रक्तदान शिबिर शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून घेतले. ऐच्छिक रक्तदात्यांना डोनर कार्डवर दोन हजार ५०० रक्तपिशव्या गरजेच्यावेळी देण्यात आल्या. अत्यवस्थेतील रुग्णांना विनामूल्य तीन हजार २०० रक्तपिशव्या देण्यात आल्या.