समाज माध्यमावर करू नका चुका, नाही तर कारागृहात जाण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 05:00 AM2021-09-12T05:00:00+5:302021-09-12T05:00:21+5:30
व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम या माध्यमांवरही आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नयेत. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा. बऱ्याचदा आपल्या ध्यानीमनी नसतानाही वाहवत जाऊन चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होतो. नंतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. व्हाॅटस्ॲप ग्रुपमध्ये चर्चेतूनच वाद पेटतात. हा प्रकारही सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्याकडे सध्या फेसबुक अकाऊंट फेक बनवून पैशाची मागणी करणे, फोटोंचा वापर करून फेक अकाऊंटवरून ट्रोल करणे अशा स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे फेसबुक अकाऊंट सुरक्षित करण्यासाठीची प्रक्रिया प्रत्येक वापरकर्त्याने समजून घेणे गरजेचे आहे.
व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम या माध्यमांवरही आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नयेत. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा. बऱ्याचदा आपल्या ध्यानीमनी नसतानाही वाहवत जाऊन चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होतो. नंतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. व्हाॅटस्ॲप ग्रुपमध्ये चर्चेतूनच वाद पेटतात. हा प्रकारही सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
- बऱ्याचदा भावनेच्या भरात चुकीच्या पोस्ट शेअर केल्या जातात. याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते.
- समाज माध्यमं हाताळताना कुठलाही आकस ठेवू नये. पोस्टचे परिणाम पाहूनच पुढे पाठवावे.
सोशल मीडियावर बदनामी; १३ जणांवर गुन्हे
सायबर सेलकडे या वर्षात सोशल मीडियाच्या अनुषंगाने तब्बल १३ गुन्हे आले आहेत. यात मुलीच्या फोटोंचा वापर करून तिची बदनामी करण्याचाही गुन्हा आहे. या आरोपीला सायबर सेलने शोधून अटक केली. याशिवाय चुकीचे मेसेज शेअर करणारे, फोटोचे माॅर्फिंग करणारेसुद्धा सायबरच्या गुन्ह्यात अडकले आहेत.
अशी घ्या काळजी
फेक अकाऊंट बनविले असेल तर अशा अकाऊंटचा शोध घेऊन त्याचा यूआरएल मागून घ्यावा.
ओळखीच्या व्यक्तीलाच फ्रेंड रिकवेस्ट सेंड करा आणि परिचित व्यक्तीचच रिकवेस्ट एक्सेप्ट करा.
कुठल्याही आमिषाला बळू पडू नका. यातून फसगत होण्याची दाट शक्यता असते.
मुलींनो डीपी सांभाळा
- समाजमाध्यमांच्या प्रोफाईलवर ठेवलेले फोटो घेऊन त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.
- फेसबुक प्रोफाईलचा फोटो इतरांच्या हाती लागू नये यासाठी प्रोफाईल लाॅक करावे.
- टू फॅक्ट ऑथेंटिकेशनचा वापर करून आपले अकाऊंट सुरक्षित करता येते.
सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम या युगात उपलब्ध झाले आहे. त्याचा सकारात्मक गोष्टींसाठी वापर केल्यास बरेच चांगले परिणाम दिसतात. मात्र, चुकीचा वापर केल्यास कारवाई अटळ आहे.
- अमोल पुरी, सायबर सेलप्रमुख.