जीवनाच्या शोधात स्मशानाच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:32 PM2018-04-06T23:32:21+5:302018-04-06T23:32:21+5:30
माणूस मृत्यू झाल्याशिवाय स्मशानापर्यंत जात नाही. फार तर एखाद्या आप्त मित्राच्या अंत्ययात्रेपुरती स्मशानाची धावती भेट होते. एरवी स्मशान समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असते.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माणूस मृत्यू झाल्याशिवाय स्मशानापर्यंत जात नाही. फार तर एखाद्या आप्त मित्राच्या अंत्ययात्रेपुरती स्मशानाची धावती भेट होते. एरवी स्मशान समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असते. मात्र, सध्या शहरातील स्मशानांवर जिवंत माणसांचा राबता आहे. ज्या स्मशानातली धूळही जिवंत माणसांना सहन होत नाही, त्याच स्मशानातल्या पाण्यावर सध्या यवतमाळच्या अनेक वस्त्यांची गुजराण सुरू आहे... पाण्याचा शोध घेणारे यवतमाळकर अखेर स्मशानाच्या दारात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनातील जिवंत माणसे पाणी पुरवू शकत नसताना मृत्यूलोकातले पाणी मागास वस्त्यांसाठी अमृत ठरत आहे..!
पाणीटंचाईने यवतमाळकरांना बेजार केले आहे. आकाशातून पाऊस आला नाही. जमिनीचा तळ खोदूनही ओलावा सापडेना. आकाश-पाताळ धुंडाळल्यावर थकलेले नागरिक शेवटी स्मशानात पोहोचले आणि काय आश्चर्य! वर्षभर ज्या स्मशानाकडे ढुंकूनही पाहिले नाही, तिथल्या हातपंपाला आणि विहिरीत घेघ्घाल पाणी सापडले! शेवटी जीवनाचा शोध स्मशानाच्या दारात संपला.
विशेषत: मागास वस्त्यांना स्मशानांनी टंचाईतही तगडा आधार दिला आहे. वाघापूर रोडवरील स्मशानभूमीच्या आत एक हातपंप आहे. दुसरा हातपंप स्मशानाच्या अगदी दाराजवळ आहे. या दोन्ही हातपंपांना सध्या माणसांची गर्दी मुंग्यांसारखी लगडलेली आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत येथे गुंड, भरणे, ड्रम भरले जात आहेत. या दोन हातपंपांना गर्दी पेलवेनाशी झाल्यावर काही लोक स्मशनापुढे असलेल्या प्राधिकरणाच्या व्हॉल्वचा आधार घेत आहेत. त्यातून ठिबकणारे थेंब साठवून घरी नेत आहेत. केवळ वाघापूरच नव्हेतर लोहारा, संभाजीनगर, चौसाळा रोड, पिंपळगाव रोड आदी परिसरातील नागरिकही येथे येऊन पाणी नेत आहेत.
हीच परिस्थिती वडगाव मोक्षधामातही आहे. तिथे मात्र नियोजनही आहे. वडगावातील काही वस्त्यांना टंचाईत मोक्षधामातील विहिरीचाच आधार आहे. तर पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमीतील हातपंपावर सध्या पाण्यासाठी गर्दी होत आहे. स्मशानाचे दर्शनही झाले तरी अनेकांना भीती वाटते. तिथे एखाद्या अंत्ययात्रेला गेलेच तर घरी येताच अंघोळी केली जाते. पण आता त्याच स्मशानांनी यवतमाळरांची तहान भागविली आहे. शेवटी स्मशानात असते कोण? आपलेच वाडवडील! तिथे गेल्यावर आशीर्वादच मिळतील ना!
आलीशान गाड्या स्मशानावर
वाघापूर रोड स्मशानभूमीवर आॅटोरिक्षा, ठेले घेऊन लोक येत आहेत आणि पाणी भरून नेत आहेत. एवढेच काय, रोज रात्री आलिशान कारमध्ये बसून काही जण येतात आणि एक-दोन छोटे ड्रम भरून पाणी नेत आहेत. या हातपंपावर गरीब-श्रीमंत भेदही संपला. पाण्याचा जपून वापर न करणाऱ्या माणसांना आता पाण्याची किंमत कळलेली आहे. ‘जिंदगी की तलाश मे हम मौत के कितने पास आ गए’ हे हिंदी सिनेगीत कोणी गांभीर्यपूर्वक ऐकले नसेल, पण आता तेच शब्द खरे ठरलेत. पाण्याला जीवन संबोधणारी माणसे पाणी शोधत स्मशानात पोहोचलीत.