पालकमंत्र्यांच्या निधीतील नाली वर्षभरातच ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:03 AM2017-07-19T01:03:52+5:302017-07-19T01:03:52+5:30
भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासनाची हमी भाजपा सरकारकडून दिली जात आहे,
मर्जीतील ठेकेदार : राजेंद्रनगरात घाणीचे साम्राज्य
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासनाची हमी भाजपा सरकारकडून दिली जात आहे, तर दुसरीकडे खुद्द पालकमंत्र्यांच्या निधीतील कामांनाच भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी केलेले काम पूर्णत: जमिनदोस्त झाले आहे. यवतमाळातील राजेंद्रनगर भागात सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम झाले. मात्र पावसाळ््यापूर्वीच नाली खचल्याने परिसरात घाण साचून दुर्गंधी पसरली आहे.
पालकमंत्री मदन येरावार यांच्या निधीतून नगरपरिषदेने राजेंद्रनगरात रस्ता डांबरीकरण आणि सिमेंट नालीचे काम केले. लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील ठेकेदारालाच हे काम देण्यात आले. प्रभाग सहामध्ये येणाऱ्या परिसरात तत्कालीन भाजपा नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडून नाली व रस्त्यांच्या कामासाठी अडीच लाखांचा निधी प्राप्त केला. नगपरिषदेने निविदा प्रक्रिया करून हे काम सुरू केले. विशेष म्हणजे या कामाचे भूमिपूजन खुद्द पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. त्याच कामाची काही महिन्यातच पूर्णत: वाताहत झाली आहे. यावरून जिल्ह्याचे प्रशासन कसे कंत्राटदाराच्या हातचे बाहुले बणले याची प्रचिती येते. काही फूट लांबीच्या नाली कामातच गुणवत्ता राखता आली नाही. या कंत्राटदाराला काम पूर्ण होताच देयके अदा करण्यात आली. त्याच्या गुणवत्तेकडे जाणीपूर्वक कानाडोळा केला. यामुळे आता परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
राजेंद्रनगरमध्ये शिख धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले गुरूद्वारा आहे, त्या लगतच लंगर हॉल आहे. त्यासमोरच्याच नालीचे काम निकृष्ट झाले आहे. काही महिन्यातच नाली पूर्णत: खचल्यामुळे घाण वाहून जाणे बंद झाले आहे. पावसाळ््यात घाण साचल्याने येथे दुर्गंधी येत आहे. याबाबत तक्रारी करूनही कोणताच फायदा झाला नाही. खुद्द जिल्हा प्रशासनाची धुरा सांभाळणाऱ्या पालकमंत्र्यांच्याच विकास निधीला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांचा दबाव वाढल्याने भाजपाच्या नगरसेवक साधना विनोद काळे आणि शिवसेनेचे नितीन बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून मर्जीतील ठेकेदार आणि नगरपरिषदेतील भ्रष्ट बांधकाम अभियंत्याविरोधात कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.