तहसीलदार कक्षात ‘वीरू’चे गळफास नाट्य

By admin | Published: November 19, 2015 03:01 AM2015-11-19T03:01:23+5:302015-11-19T03:01:23+5:30

पोलीस ठाण्यातील टॉवरवर वीरूगिरी करणाऱ्या तरुणाने बुधवारी चक्क तहसीलदारांच्या कक्षाचा ताबा मिळविला.

The drama of 'Veeru' in Tahsildar's room | तहसीलदार कक्षात ‘वीरू’चे गळफास नाट्य

तहसीलदार कक्षात ‘वीरू’चे गळफास नाट्य

Next

दिग्रसचा प्रकार : अतिक्रमित जमीन मुक्त करण्याचे प्रकरण
दिग्रस : पोलीस ठाण्यातील टॉवरवर वीरूगिरी करणाऱ्या तरुणाने बुधवारी चक्क तहसीलदारांच्या कक्षाचा ताबा मिळविला. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर गळफास घेण्याची धमकी ध्वनिक्षेपकावरून देऊ लागला. दुपारी ३ वाजतापासून सुरू झालेल्या या प्रकाराने तहसीलदार प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वृत्त लिहिस्तोवर तो तहसीलदारांच्या कक्षातच ठाण मांडून होता. दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.
श्याम गायकवाड रा. इसापूर असे तहसीलदारांच्या कक्षात कोंडून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तहसीलदारांच्या कक्षात कुणीही नसताना त्याने प्रवेश केला. आतून दाराला कडी लावून घेतली. तसेच छताच्या पंख्याला नॉयलॉनचा दोर बांधून त्याचा फास स्वत:च्या गळ्यात टाकला. त्यानंतर सोबत नेलेल्या ध्वनिक्षेपकावरून मी तहसीलदारांच्या कक्षात असून माझ्या मागण्या पूर्ण न झाल्यास फाशी घेणार असल्याची धमकी देणे सुरू केले. हा प्रकार माहीत होताच तहसील कार्यालय परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली. तत्काळ दिग्रस ठाणेदारांंना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने ध्वनिक्षेपकावरून बळजबरीने कुणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर फाशी घेईल, असे सांगू लागला. त्यामुळे पोलिसांचाही नाईलाज झाला.
तो सारखा ध्वनिक्षेपकावरून आपल्या मागण्या सांगत होता. प्रशासकीय अधिकारी नायब तहसीलदार प्रकाश खाटीक, तलाठी प्रवीण दुधे, तलाठी नारायण हागोणे यांनी श्यामला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जिल्हाधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कक्षाच्या बाहेर येणार नाही, अशी भूमिका घेतली.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला तहसीलदार नितीन देवरे गेले होते. तसेच तहसीलदार कक्षाच्या शिपायाची नजर चुकवित त्याने प्रवेश केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे श्यामने सोबत पाण्याची बॉटल, ध्वनिक्षेपक, विषारी औषधाची बॉटलसुद्धा नेली आहे. दरम्यान तहसीलदार नितीन देवरे यांच्याशी संपर्क साधला असता इसापूर येथील अतिक्रमित जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. लवकरच अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे सांगितले. परंतु श्याम मात्र कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. (प्रतिनिधी)

दोनदा टॉवरवर चढून धरले प्रशासनाला वेठीस
दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील ई-क्लास जमिनीवर काही नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गावातीलच श्याम गायकवाड प्रशासनाचे उंबरठे झिजवून थकला. शेवटी त्याने आंदोलनात्मक पवित्रा घेतला. सर्व प्रथम ७ जुलै २०१४ रोजी दिग्रस पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेश टॉवरवर जाऊन चढला. त्यावेळी प्रशासनाने या जमिनीची मोजणी करून अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे गत महिन्यात २९ आॅक्टोबर रोजी पुन्हा पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून बसला. तब्बल ३० तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तहसीलदार व भूमिअभिलेख अधीक्षकांनी शासकीय जमिनीची मोजणी केल्याची खात्री झाल्यानंतर खाली उतरला. मात्र ही जमीन केवळ मोजणीवरच थांबल्याने श्याम पुन्हा संतप्त झाला आणि बुधवारी चक्क तहसीलदारांच्या कक्षाचा ताबा घेतला.

Web Title: The drama of 'Veeru' in Tahsildar's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.