पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले, बनला चक्क खुनात आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:32+5:30
लोहारातीलच एका दिवंगत भाईचे पंटर म्हणून चव्हाण बंधूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तोच दरारा कायम ठेवला. दरम्यान सिद्धार्थ वानखडे व देवा यांच्यात वाद नव्हता. एका जुगाराच्या डावात देवा व सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्रतिस्पर्धी समर्थकांना मारहाण सुरू झाली. हे प्रकरण पुढे वाढतच गेले. त्यातून खून झाले. दरम्यान चव्हाण बंधूचा भैया यादव सोबतही वाद झाला, त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोहारासारख्या छोट्याशा गावात थेट टोळीयुद्ध भडकावं याची कारणं काय याचा शोध घेतला असता भयान वास्तव पुढे आले. पोलीस बनण्याची स्वप्न पाहत मेहनत करणारा युवक कळत न कळत गुन्हेगाराच्या हातात लागला आणि तो खुनातील आरोपी बनला. त्याचा हा प्रवासच गुन्हेगारी जगतातील वास्तव मांडणारे आहे.
देविदास उर्फ देवा निरंजन चव्हाण (२६) या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचा भररस्त्यात खून झाला. देवा व दुर्गेश हे दोन्ही भाऊ लोहारा परिसरात गुन्हेगार म्हणून परिचित आहे. त्यासोबतच सिद्धार्थ उर्फ सिद्धू रामदास वानखडे (३६) हा ही सक्रिय गुन्हेगार आहे. दीपक उर्फ भैया राममनोहर यादव (३५) याचा गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असून अवैध दारू विक्री हा व्यवसाय आहे.
लोहारातीलच एका दिवंगत भाईचे पंटर म्हणून चव्हाण बंधूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तोच दरारा कायम ठेवला. दरम्यान सिद्धार्थ वानखडे व देवा यांच्यात वाद नव्हता. एका जुगाराच्या डावात देवा व सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्रतिस्पर्धी समर्थकांना मारहाण सुरू झाली. हे प्रकरण पुढे वाढतच गेले. त्यातून खून झाले. दरम्यान चव्हाण बंधूचा भैया यादव सोबतही वाद झाला, त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो सुदैवाने अपयशी ठरला. या कालावधीत गुन्हेगारी जगतापासून अलिप्त असलेला सिद्धांत राजेश रावेकर (२८) हा आपला परंपरागत चिकन विक्रीचा व्यवसाय सांभाळून पोलीस भरतीसाठी जीवापाड मेहनत करीत होता. दोन वेळा पोलीस भरतीत त्याला फार कमी गुणांनी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांने जिद्द सोडली नव्हती. तो आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करीत होता.
लोहारातील दोन टोळ्या उदयास आल्या. त्यात सिद्धू वानखडे याच्या टोळीला शारदा चौक परिसरातून पाठबळ मिळाले. तर चव्हाण बंधूंना मोहा फाटा येथून पाठबळ मिळाले. या जोरावर मारहाणीपर्यंतचे शत्रूत्व थेट अस्तित्व संपविण्यापर्यंत पोहोचले. या दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात कधी सिद्धांत रावेकर याचा वापर झाला हे त्यालाही कळले नाही. पोलीस बनण्याचे स्वप्न पाहणारा सिद्धांत कायद्याला मानणारा व इमाने इतबारे दैनंदिन दिनचर्या सांभाळणारा होता. मात्र चव्हाण बंधू व वानखडे यांच्यातील एका भांडणात सिद्धांत रावेकर याच्यावरही ३०७ चा गुन्हा दाखल झाला. आता आपण काहीही झाले तरी पोलीस होणार नाही, आपले आयुष्य धुळीला मिळविले याची त्याला जाणीव झाली. ज्याच्यामुळे स्वप्न भंगले त्याचा सूड घ्यायचा अशी भावना त्याच्यात निर्माण झाली व चव्हाण बंधूच्या विरोधकांनी त्याला सोईस्कर हवा दिली. यातूनच देवा चव्हाण याच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि देवाच्या वर्मावर घाव घालण्याचा प्रण सिद्धांतने उचलला. हाच फायदा सक्रिय गुन्हेगार असलेल्या सिद्धू वानखडे, भैया यादव या गुन्हेगारांनी घेतला.
बुधवार २६ आॅगस्टला देवा चव्हाण याचा पाठलाग सुरू झाला. देवाचा भाऊ सोहेलच्या खुनात कारागृहात आहे. त्यामुळे देवाला संपविणे सहज शक्य आहे, हे हेरुनच सिद्धार्थ व भैया यादवने फिल्डींग लावली. त्यासाठी वापर केला सिद्धांत रावेकर याचा. भैया यादवने कारने देवाच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर सिद्धांतने भररस्त्यात सत्तुराने देवाचा गळा कापला. उर्वरित तिघांनी इतर अवजारांनी वार केले. यात देवा जागीच गतप्राण झाला. यवतमाळच्या गुन्हेगारीत अशाच पद्धतीने सक्रिय गुन्हेगारांकडून नवख्यांचा वापर केला जात आहे. भावनात्मक करून त्याच्या हातून काम साध्य केले जात आहे. सिद्धांत रावेकर सारखे अनेक जण सक्रिय गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.
सहकाऱ्यासमोरच चिरला गळा
देवा चव्हाण याला आपल्यावर हल्ला होणार याची कुणकुण लागली होती. त्यामुळे घराबाहेर पडताना पाच ते सात जणांना सोबत घेऊनच निघत होता. घटना घडली त्यावेळीही देवासोबत त्याचे साथीदार होते. कारने धडक दिल्यानंतर देवाने साथीदारांना पळण्याचा इशारा केला. त्याने स्वत:ही पायातील बुट काढून पळायला सुरुवात केली. मात्र त्याची दिशा चुकली. साथीदार ज्या दिशेला गेले त्याच्या विरुद्ध दिशेला देवा पळाला व मारेकऱ्यांच्या हाती लागला.