आकाशाला कवेत घेण्याचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 05:00 AM2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:12+5:30
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहीम (२८) या तरुणाने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मंगळवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्याच हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक करताना दुर्दैवी अपघात घडला. यात शेख इस्माईल शेख इब्राहीम याचा मृत्यू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेख इस्माईलने आकाशाला कवेत घेण्याचे स्वप्न पाहिले. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण होऊनही त्याच्यात वैज्ञानिक जाणीव जागृत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : त्याने हवेत उंच भरारी घेण्याचे स्वप्न बघितले. त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून रात्री अपरात्री प्रचंड कष्ट उपसले. स्वत: सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्याच्या स्वप्नांनी तो पूर्णत: पछाडला होता. मात्र नियतीच्या मनात दुसरेच काहीतरी शिजत होते. अखेर हवेत भरारी घेण्यापूर्वीच काळाने डाव साधून त्याच्यावर घाला घातला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्याने हेलिकाॅप्टर निर्मितीवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले होते. यासाठी पै-पै जमवून तो आवश्यक साहित्य खरेदी करीत असत.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहीम (२८) या तरुणाने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मंगळवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्याच हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक करताना दुर्दैवी अपघात घडला. यात शेख इस्माईल शेख इब्राहीम याचा मृत्यू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेख इस्माईलने आकाशाला कवेत घेण्याचे स्वप्न पाहिले. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण होऊनही त्याच्यात वैज्ञानिक जाणीव जागृत होती. गेल्या तीन वर्षांपासून हेलिकॉप्टर निर्मितीचा छंद जोपासला. मात्र परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कुटुंबाला मदत म्हणून तो वडिलांच्या बरोबरीने वेल्डींगचे कामही करीत होता. त्याचे वडील शेख इब्राहीम शेख मैनोद्दीन ५७ वर्ष वयाचे आहे. आई नजरजानबानो शेख इब्राहीम ५२ वर्षाच्या आहेत. दोघांचेही शिक्षण सातवीपर्यंतच झाले आहे. भाऊ शेख मुसव्वीर शेख इब्राहीम ३३ वर्षाचा असून त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. बहीण सायकाबी हिचा विवाह झाला आहे. हे सर्व कुटुंबीय आर्थिक परिस्थिती नसतानाही मुन्नाला त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सहकार्य करीत होते. येत्या १५ ऑगस्टला शेवटची चाचणी घेवून त्यानंतर सिंगल सीट हेलिकाॅप्टरच्या पेटंटसाठी अर्ज करायची तयारी होती. कुटुंबीयाकडून मुलाच्या या उपक्रमाबद्दल मोठा उत्साह होता. मुन्नाचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर सर्वांचीच आर्थिक परिस्थितीही सुधारणा होती, मात्र कदाचित नियतीला हे मंजूर नव्हते, मंगळवारी रात्री प्रात्यक्षिकादरम्यान झालेल्या अपघातात मुन्नासह कुटुंबीयांचेही हे स्वप्न भंगले.
मुन्नाच्या अपघाती जाण्याने मित्र परिवाराला धक्का
- मित्र शेख जब्बार शेख इब्राहीम म्हणाले की, आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही कसबपणाला लावून हेलिकॉप्टर निर्मितीचा ध्यास घेतला होता, मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्याच्या अपघाती निधनाने सर्वच मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
- तर सोहेलोद्दीन शफीयोद्दीन नवाब याने गावाला नावलौकिक मिळवून देण्यापूर्वीच शेख इस्माईलचा मृत्यू झाल्याचे सांगत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नातेवाईक खुर्शीद अक्रम खुर्शीद मुनाफ यांनी ही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.