सपनाच्या खुनाचा तपास ठरला उत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:43 PM2018-09-05T23:43:23+5:302018-09-05T23:43:52+5:30
घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या खुनाचा तपास व त्यानंतर न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा हा राज्यात उत्कृष्ट ठरला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने त्यावर ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ची मोहर उमटविली असून तपासी पोलीस अधिकाºयांचा गौरव केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या खुनाचा तपास व त्यानंतर न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा हा राज्यात उत्कृष्ट ठरला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने त्यावर ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ची मोहर उमटविली असून तपासी पोलीस अधिकाºयांचा गौरव केला जाणार आहे.
सपना पळसकरच्या खुनाचा तपास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनसिंह भिकमसिंह बायस यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सहायक फौजदार अकील देशमुख, जमादार अरुण नाकतोडे, गजानन अजमिरे व पोलीस शिपाई आशिष भुुसारी यांनी केला होता. या सर्वांचा आता १० सप्टेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे मुख्यालयात पोलीस महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव केला जाणार आहे.
२४ आॅक्टोबर २०१२ ला सायंकाळी घराच्या आवारात (चोरंबा ता. घाटंजी) खेळत असताना अचानक सपना पळसकर गायब झाली. ती हरविल्याची तक्रार दुसºया दिवशी घाटंजी पोलिसात नोंदविली गेली. प्रकरण गाजल्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला गेला होता. पोलीस निरीक्षक चंदनसिंह बायस व चमूने आपले कसब पणाला लावून व गावात साध्या वेशात मुक्कामी राहून हा गुन्हा उघडकीस आणला. नरबळीसाठी जवळच्या नातेवाईकांनीच सपनाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सपनाच्या आजी (आईची आत्या), मामा, आजोबा अशा आठ जणांना आरोपी बनविण्यात आले. या तपासात डीएनए टेस्ट करण्यात आली होती. हा खटला यवतमाळच्या सत्र न्यायालयात चालला. या शिक्षेला आता नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या तपासाची सीआयडीने दखल घेतल्याने जिल्हा पोलीस दलात समाधान व्यक्त होत आहे.
नातेवाईकच फितूर !
मृतक सपनाचे रक्ताचे नातेवाईकच न्यायालयात फितूर झाले. मात्र डीएनए रिपोर्टवरून तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला.
पाच आरोपींना फाशी
आठ पैकी एका आरोपीचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला. उर्वरित सात आरोपींपैकी पाच जणांना फाशी तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली.