दिग्रस तालुक्यातील युवकांचे रोजगाराचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:40 AM2021-03-25T04:40:28+5:302021-03-25T04:40:28+5:30
दिग्रस : तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचे स्वप्न भंगले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील औद्योगिक विकास महामंडळाने जमीन अधिग्रहित करून एमआयडीसीचा ...
दिग्रस : तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचे स्वप्न भंगले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील औद्योगिक विकास महामंडळाने जमीन अधिग्रहित करून एमआयडीसीचा केवळ बोर्ड लावून ठेवला. हा बोर्ड तरुणांना रोजगाराच्या वाकुल्या दाखवीत आहे.
लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात आजपर्यंत एकही मोठा उद्योग सुरू झाला नाही. आता एमआयडीसीचा लावण्यात आलेला फलकही गंज लागून सडून गेला आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे स्वप्न भंग पावले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महाराष्ट्र शासन औद्योगिक विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी लघु उद्योग सुरू करण्यासाठी भूमी अधिग्रहण केली. त्यातील अनेक तालुक्यातील एमआयडीसीच्या जागेवर छोटे-छोटे उद्योगही सुरु झाले. मात्र, दिग्रस तालुका या उद्योगाच्या स्पर्धेत कितीतरी मागे राहिला आहे.
इतर तालुक्यांप्रमाणे दिग्रस शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्णी मार्गावर एमआयडीसीसाठी भूमी अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी रस्ते, पाणी, विजेची समस्या समोर करून इच्छुक उद्योजकांना तिकडे येऊच दिले नाही. त्यामुळे भूमी अधिग्रहण करणे एवढेच कार्य झाले. त्या जागी महाराष्ट्र उद्योग मंडळाने लावलेले फलक आता तालुक्यातील बेरोजगारांना वाकुल्या दाखवीत आहे. कोणतीही निवडणूक आली की, मोठी-मोठी आश्वासने देणारे स्थानिक आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी मात्र या औद्योगिक विकासाच्या संदर्भात काहीच बोलत नाहीत. निवडून आले की, तालुक्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे नेहमीच घडत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक समस्या अजूनही जशाच्या तशाच आहेत.
बॉक्स
एकमेव जिनिंगही पडला बंद
आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जागा अधिग्रहण केलेल्या परिसरात पाणी, रस्ते, विजेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येथे उद्योजकांनी छोटे-छोटे उद्योग उभारायला हरकत नाही. तशा प्रकारचे प्रोत्साहन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने दिल्यास निश्चितच तालुक्यात उद्योग सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. शहरात एक उद्योग म्हणून जिनिंग होता. तोही कापसाचा नापिकीमुळे बंद पडला आहे. आता शहरात एखादा उद्योग उभा राहिल्यास तालुक्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल.