राष्ट्रसंतांवरील चित्रपट निर्मितीचे स्वप्न अधुरेच; राजदत्तांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:15 AM2018-01-22T10:15:58+5:302018-01-22T10:16:23+5:30
संत गाडगेबाबा आणि डॉ.पंजाबराव देशमुखांवर मी चित्रपट केलेत. मात्र राष्ट्रसंतांवर चित्रपट निमिर्तीचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
संतोष कुंडकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी (यवतमाळ) : संत गाडगेबाबा, डॉ.पंजाबराव देशमुख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या रुपाने विदर्भाने तीन ‘ख’ दिलेत. गाडगेबाबांनी खराट्याची, डॉ.पंजाबराव देशमुखांनी खडूची आणि राष्ट्रसंतांनी खंजिरीची महती सांगितली. संत गाडगेबाबा आणि डॉ.पंजाबराव देशमुखांवर मी चित्रपट केलेत. मात्र राष्ट्रसंतांवर चित्रपट निमिर्तीचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वणी येथे आलेल्या राजदत्तांनी शनिवारी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा केल्या. तुकडोजी महाराजांवरील चित्रपट निर्मिती हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असून राष्टसंतांनी सांगितलेल्या ग्रामगीतेत समाजव्यवस्था बदलण्याची ताकद आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार झाला तर, तो चित्रपट निश्चितच परिणामकारक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातील अनेक बाबी उलगडल्या. चित्रपटसृष्टीसारख्या मायावी जगात राहुनही त्याचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता अगदी ऋषीतुल्य जीवन जगणाऱ्या राजदत्तांची साधी राहणी आणि त्यांच्यातील सामाजिक जाणिवा सर्वांनाच अचंबीत करणाऱ्या आहेत. चित्रपटातून केवळ रंजन होऊ नये, त्यातून एखादा चांगला संदेशही समाजापर्यंत पोहचावा, ही त्यांची कायम भावना आहे.
वर्धा शहरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातून निघणाऱ्या एका दैैनिकात पत्रकार म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतर पुढे चित्रपटसृष्टीत कसा प्रवेश झाला, याची रंजक कथाच राजदत्तांनी सांगितली. ते म्हणाले, पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर एक-दीड वर्षांतच ते दैैनिक बंद पडले. वडिल रेल्वेत नोकरीवर असले तरी परिस्थिती बिकट असल्याने वडिलांकडूनही आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे थेट मद्रास गाठले. तेथे मुलांसाठी असलेल्या ‘चांदोबा’ या पाक्षिकात भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी हे पाक्षिक १२ भाषांमध्ये प्रकाशित व्हायचे. अनेक दिवस तेथे काम केल्यानंतर त्या ठिकाणीही मन रमेना. अशातच मद्रास येथे काही कामानिमित्त आलेल्या राजा परांजपेची भेट झाली. त्यांच्यापुढे मनातील भावना व्यक्त केल्या. चित्रपटासाठी काम करायची इच्छा त्यांच्यापुढे प्रगट केली आणि राजा परांजपेंनी मला पुन्हा पुण्यात नेले. तेथे त्यांनी ‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली.
विनोदी धाटणीचा हा पहिलाच चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतला. मात्र त्यानंतर मला अनेक महिने कामच मिळाले नाही. नंतर कोल्हापूर गाठले. तेथे राजा परांजपेंचे गुरू भालजी पेंढारकर यांची भेट घेतली. त्यांचा सहाय्यक म्हणून काम करण्याची ईच्छा त्यांच्यापुढे व्यक्त केली. मात्र सहाय्यक म्हणून काम करशील तर सहाय्यकच राहशील, असा वडिलकीचा सल्ला भालजींनी राजदत्तांना दिला.
हाती काम नव्हते. खिशात पैैसे नव्हते. ही परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा भालजींनी पटकथांमधील नोटस् काढण्याची जबाबदारी राजदत्तांवर सोपविली. पुढे भालजींनी स्वत: निर्मिती केलेल्या ‘घरची राणी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली. या चित्रपटाला महाराष्ट शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. येथून कधीच मागे वळून पाहिले नाही. अपराध, अरे संसार संसार, देवकीनंदन गोपाला, भोळी भाबडी, सर्जा, मुंबईचा फौैजदार, राघुमैैना, शापित, पुढचं पाऊल, झेप, देवमाणूस, भालू, अर्धांगिनी, अष्टविनायक यांसह ३१ चित्रपटांचे दिग्दर्शन मी केले, अशी माहिती राजदत्तांनी दिली. यांपैैकी तीन चित्रपटांना राष्टपती पुरस्कार तर १३ वेळा महाराष्ट शासनाचा पुरस्कार मिळाला असल्याचे ते म्हणाले.
‘राजदत्त’ नावातील गुपीत
राजदत्तांचे मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू असे आहे. परंतु गुरूप्रती असलेल्या अफाट श्रद्धेतून चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील राज आणि स्वत:च्या नावातील दत्त या शब्दांना एकत्रित करून त्यांनी स्वत:चे नाव राजदत्त असे करून घेतले. चित्रपट सृष्टीत त्यांना आजही याच नावाने ओळखले जाते.