नगरपालिकेच्या शिक्षकांना ‘ड्रेसकोड’
By admin | Published: July 3, 2017 02:00 AM2017-07-03T02:00:10+5:302017-07-03T02:00:10+5:30
नगरपालिकेच्या शाळांमधील वातावरण खासगी शाळांप्रमाणे चकाचक दिसावे, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.
आयकार्डही घाला : शिक्षण समितीचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपालिकेच्या शाळांमधील वातावरण खासगी शाळांप्रमाणे चकाचक दिसावे, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. चालू सत्रापासून पालिकेच्या शाळेतील शिक्षक-शिक्षिकांना गणवेश सक्तीचा करण्यात येणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सर्व शिक्षा अभियानातून पैसे कधी मिळतील याबाबत अनिश्चितता आहे.
विशेष म्हणजे, नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांना एकसमान गणवेश असावा, यासाठी शिक्षकच आग्रही होते. गेल्या सत्रात काही उत्साही शिक्षकांनी स्वत:हून काळी पॅण्ट आणि पांढरा शर्ट, असा पेहराव गणवेश म्हणून स्वीकारला होता. खासगी शाळांप्रमाणे यवतमाळ नगरपालिकेच्या विस शाळांनाही चकाचक चेहरा मिळावा म्हणून शिक्षकांना ड्रेसकोड द्यावा, अशी मागणी शिक्षकांनीच शिक्षण समितीकडे केली होती. त्यानुसार, ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.
गणवेशासोबतच शिक्षकांना आयकार्ड घालणेही बंधनकारक करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला. शालेय परिसरात गणवेश आणि ओळखपत्र घालणे शिक्षकांना अनिवार्य राहणार आहे. मात्र, गणवेश कोणत्या रंगाचा असावा, याबाबत शिक्षण समितीने निर्णय घेतलेला नाही. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन गणवेशाचा रंग ठरविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.