ग्रामीण भागात टंचाई काळात प्यावे लागते विषाक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:55 PM2018-04-04T21:55:19+5:302018-04-04T21:55:19+5:30
जिल्ह्यात ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला असून अनेक गावात दुसरा कोणताही जलस्रोत नसल्याने टंचाई काळात दूषित पाणी प्यावे लागत आहे. जलस्रोतावर धोक्याचा इशारा देणारे फलक लावले असले तरी नाईलाजाने नागरिकांवर तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला असून अनेक गावात दुसरा कोणताही जलस्रोत नसल्याने टंचाई काळात दूषित पाणी प्यावे लागत आहे. जलस्रोतावर धोक्याचा इशारा देणारे फलक लावले असले तरी नाईलाजाने नागरिकांवर तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१६ तालुक्यातील जलस्रोताचे नमुने घेतल्यानंतर ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यात दारव्हा, मारेगाव, राळेगाव, घाटंजी, नेर, महागाव, बाभूळगाव, कळंब, वणी आदी तालुक्यांचा समावेश आहे. येथील पंचायत समितीने ग्रामपंचायतींना पत्र पाठवून पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले. तसेच त्या ठिकाणी फलक लावण्याचेही आदेश दिले आहे. प्रशासनाने अनेक जलस्रोतांना रेड कार्ड दिले असून अशा ठिकाणी धोक्याची सूचनाही लावली आहे. हातपंपांना लाल रंग लावले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. अशा टंचाईच्या काळात अनेक ठिकाणी नागरिकांना अशुद्ध पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. तर काही गावांमध्ये पर्यायी जलस्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणीच प्यावे लागत आहे. घाटंजी तालुक्यातील रोहीपेंड व सायफळ या गावातील जलस्रोत फ्लोराईडयुक्त आहे. हातपंप लाल रंगाने रंगविले आहे. गावकऱ्यांनाही धोक्याबाबत माहिती देण्यात आली. परंतु पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना लालरंग दिलेल्या फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने या गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तेव्हा वास्तव पुढे आले. सातत्याने फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यामुळे या गावातील नागरिकांना व्यंग आले आहे. अकाली वृद्धत्व येत असून लहान मुलांचे दातही किडत आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील बहुतांश फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या गावांची आहे.
फ्लोराईडयुक्त आणि दूषित पाणी प्यायल्याने अनेक आजार जडत आहे. नेर तालुक्यातील आसोला या गावात दूषित पाणी प्राशनाने किडनीचे रुग्ण वाढले आहेत. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्यासाठी आता उपाययोजना चालविल्या आहेत. मात्र आजही अनेक गावात पाणीच मिळत नाही. टंचाईच्या या काळात नागरिक मिळेल तेथून पाणी उपलब्ध करतात आणि तेच अशुद्ध पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पितात.