पाणी भरलेला टँकर नाल्यात कोसळला, चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 18:19 IST2022-03-24T18:16:55+5:302022-03-24T18:19:50+5:30
गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान कुंभा गावाजवळील टँकर नाल्यात कोसळला. यात टँकरचालक शिवदास जयसिंग राठोड यांचा दबून जागीच मृत्यू झाला.

पाणी भरलेला टँकर नाल्यात कोसळला, चालक जागीच ठार
मारेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील कुंभा परिसरात बेंबळा धरणाच्या कालव्याची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामावर पाणीपुरवठा करणारा टँकर पाणी भरून कामावर जात असताना गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अचानक नाल्यात कोसळून चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
सध्या तालुक्यात बेंबळा धरण कालवा दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या बांधकामांना पाणीपुरवठा करणारा टँकर पाणी भरून दहेगावकडे जाणाऱ्या कालव्याच्या दिशेने जात होता. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान कुंभा गावाजवळील टँकर नाल्यात कोसळला. यात टँकरचालक शिवदास जयसिंग राठोड यांचा दबून जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त कळताच कालव्यावर काम करणाऱ्या मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन उलटलेला टँकर सरळ करून चालकाला बाहेर काढले; परंतु तोपर्यंत चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पुढील तपास मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत.