अवकाळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:25 PM2018-04-15T23:25:54+5:302018-04-15T23:26:10+5:30
विजांच्या प्रचंड कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपिटीने रविवारी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यात महागाव तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार तर पाच गंभीर झाले.
यवतमाळ : अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने रविवारी जिल्ह्यात हाहाकार उडाला. विजांच्या प्रचंड कडकडाटासह गारपीटीने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. महागाव तालुक्यात वीज कोसळून चार जणांचे बळी गेले, तर दारव्हा तालुक्यातील बोदगव्हाण येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. वादळामुळे अनेक तालुक्यात घरांची पडझड झाली. काही शाळांवरील टीनपत्रे उडून गेली. या वादळ व पावसामुळे शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर नवीन संकट कोसळले. या संकटातून उभारी घेण्यासाठी पुन्हा शेतकºयांना पराकाष्ठा करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विजांच्या प्रचंड कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपिटीने रविवारी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यात महागाव तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार तर पाच गंभीर झाले. वादळी पाऊस व गारपिटीने महागाव, उमरखेड, दारव्हा, आर्णी आदी तालुक्यांना जबर तडाखा दिला.
जिल्ह्यात रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटात गारपिटीला सुरुवात झाली. महागाव तालुक्यात वेणी-वाकोडी शिवारातील एका झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या प्रभू नारायण जाधव (४५), पंडित दिगांबर हरणे (३०), अनिल विष्णू सगरुळे (२५), लक्ष्मण रमेश चोपडे (१८) सर्व रा. वेणी या चौघांचे बळी घेतले. तर शिवाजी संभाजी बगळे (२६), दत्ता गोविंदराव मदने (२३), बंडू सूर्यभान सरकाळे (३२), कैलास उत्तम सुरोशे (२३) रा. वेणी व गुणवंत शिवराम सुरूदुसे (३०) रा. वाकोडी हे गंभीर जखमी झाले.
वाकोडी येथे वीज कोसळून एक बैलजोडी व गाय ठार झाली. धारमोहा, उटी, वेणी, वाकोडी, हिवरासंगम, कोठारी आदी परिसराला वादळाचा तडाखा बसला. मुडाणा ते गौळ रस्त्यावर धारमोहाजवळ झाड उन्मळून पडले. या मार्गावर पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.
दारव्हा तालुक्यात बोरीअरब परिसरातील बोधगव्हाण येथे वीज कोसळून सात शेळ्या दगावल्या. बसस्थानकालगतच्या कडूनिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने त्या खालील शेळ्या जागीच ठार झाल्या. शिवदास पांडव, मोतीराम पवार, मंदाबाई पांडव यांच्या प्रत्येकी दोन तर सुदाम पांडव यांची एक शेळी होती. याच तालुक्यातील महातोली येथील भुराजी विद्यालयाचे छप्पर वादळाने उडून गेले. महागाव कसबा, दहेली, साजेगाव, धनगरवाडी, रामगाव येथील काही घरांवरील टीनपत्रे उडून गेले. तसेच घरांच्या भिंती कोसळल्या. वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
आर्णी तालुक्यात सावळी सदोबा, उमरी कापेश्वर परिसराला गारपिटीने झोडपले. कोसदनी येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर वादळाने उडाले. तालुक्यातील दोनवाडा गावातील एका घराचेही मोठे नुकसान झाले.
घाटंजी, राळेगाव परिसरात वादळासह पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ परिसरालाही विजांच्या कडकडाटासह वादळाने तडाखा दिला. यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार परिसरात वादळामुळे अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेले. काही काळ वीज पुरवठाही खंडित होता.