दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किंमती भडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:57 AM2019-05-09T11:57:11+5:302019-05-09T11:58:57+5:30
राज्य दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना पशुखाद्यांच्या किंमतीत दुप्पटीने भडकल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना पशुखाद्यांच्या किंमतीत दुप्पटीने भडकल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत. गोपालकांचा आर्थिक डोलारा गडगडण्याचा धोका वाढला आहे. यामुळे दुधाच्या किंमती भडकण्याची चिन्हे आहेत.
दुष्काळी स्थितीने जनजीवनासोबत पशुधनावरही परिणाम झाला आहे. कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणीटंचाईसह चाराटंचाई निर्माण झाली आहे. आता पशुखाद्याच्या कच्या मालाच्या किमतीत वर्षभरात दुपटीने वाढ झाली आहे. ही दरवाढ पशुपालकांना झेपणारी नाही. यामुळे दुधाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. येणाºया खरीप हंगामापर्यंत ह्या किमती अशाच राहण्याची शक्यता व्यावसायिक वर्तवित आहे.
गतवर्षी मक्याच्या किमती १२ रूपये किलो होत्या. यावर्षी ही किंमत २५ ते ३० रूपयांपर्यंत वाढली आहे. सरकी १७०० रूपये क्विंटलवरून ३००० रूपये क्विंटलवर पोहोचली आहे. फल्ली पेंडचे दर ३० रूपयांवरून ४० रूपयांवर पोहोचले आहे. तुरीची चुरी १५०० रूपये क्विंटलवरून १९०० रूपये क्विंटलवर पोहोचली. सुग्रास हा पौष्टीक आहार १६०० रूपयांवरून २००० रूपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. पुढील काळात ह्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पशुखाद्याचे सध्याचे दर पशुपालकांना परवडणारे नाही. या स्थितीत गोपालकांना जनावरांसाठी आहार पुरविणे अवघड झाले. ओला चाराही उपलब्ध होत नाही. यामुळे दुध उत्पादनही घटले आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्याने दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता गोपालक वर्तवित आहे. मात्र दुध डेअरी चालकांनी वाढीव दराबाबत मौन पाळले आहे. यामुळे दूध उत्पादकांची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
शासकीय डेअरीचे दूध संकलन घटले
विदर्भातील शासकीय डेअरीमधील दूध संकलन घटले आहे. त्यासोबतच खासगी डेअरीमधील संकलित दुधाचा आकडा घटला आहे. यामुळे दुहेरी नुकसानाचा सामना गोपालकांना करावा लागत आहे. यातून दुधाचे दर वाढविण्याची मागणी गोपालकांकडून होत आहे.
तूर चुरीचा आलप म्हणून वापर
पशुखाद्यामधील ढेपीचे दर सर्वाधिक महागडे आहे. त्याला पर्याय म्हणून तुरीच्या चुरीला सर्वाधिक मागणी आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले आहे. यामुळे दालमिल चालकांकडून तुरीच्या चुरीची खरेदी वाढली आहे.