बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:21 PM2018-12-22T22:21:25+5:302018-12-22T22:21:51+5:30
येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. त्याचबरोबर अनेक मेडिकल स्टोर्समध्ये अप्रशिक्षितांकडून औषधांची विक्री केली जात आहे.
वणी शहरात जवळपास १५० च्यावर औषधी विक्रीची दुकाने आहेत. मात्र यातील काही दुकानांतून एमबीबीएस किंवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीव्यतिरीक्त अनेक बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठ्यावर कोणतीही चौकशी न करता मेडीकलचालक बिनधास्तपणे औषधांची विक्री करीत आहे. त्यामुळे या बोगस डॉक्टर व मेडिकलचालकांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे.
त्याचबरोबर या मेडीकलमध्ये औषधी निर्माण शास्त्राची पदविका किंवा पदवी घेतलेल्यांनाच बसणे बंधनकारक आहे. मात्र अनेक मेडिकलचालकांकडे अद्यापही ही पदवी नसून त्यांनी काही विद्यार्थ्यांकडून सात ते आठ हजार रूपये दरमहाप्रमाणे त्यांच्या पदव्या आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलले जाते. अधिकृत पदविधारक मात्र या औषधी दुकानात क्वचितच आढळून येतो.
अन्यवेळी दुकानाचा मूळ मालकच औषधांची विक्री करीत असल्याचे दिसून येते. या औषधी दुकानांमध्ये काम करणारे अनेक कामगार हे अप्रशिक्षीत आहे. या अप्रशिक्षीतांकडून औषधांची सर्रास विक्री केली जात आहे. मूळ मालक केवळ पैशाच्या काउंटरवर बसून बिले घेण्यातच व्यस्त असतो. अनेकदा एखादी औषधी आपल्या दुकानात उपलब्ध नसल्यास त्याला मिळतेजुळते घटक असणारी औषधी रूग्णांच्या माथी मारली जाते. या सर्व प्रकाराकडे मात्र अन्न व औषधी प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या विभागाचे अधिकारी व कर्मचारी वणीत फिरकत नसल्यामुळे येथील संबंधित मेडीकलचालकांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री
येथील काही मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्यांचीही सर्रासपणे विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. मुळात या गोळ्यांवर शासनाने बंदी घातली असली तरी छुप्या मार्गाने त्याचा वणीत पुरवठा केला जात आहे. या गोळीची किंमत ५०० रूपयांच्या आत असली तरी या गोळ्या मेडिकलचालक तब्बल पाच ते सहा हजार रूपयांपर्यंत विकत असल्याची माहिती आहे. अशा गोळ्या केवळ तज्ज्ञ डॉक्टरच गरज वाटल्यास देऊ शकतो. मात्र मेडिकलचालक स्वत:च या गोळ्यांची विक्री करीत आहेत.