धक्कादायक... मद्यधुंद मुलानेच केला आईचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 10:46 AM2022-01-31T10:46:55+5:302022-01-31T10:50:42+5:30
रात्री १ वाजेच्या सुमारास तो घरी परतला. त्याने आईला झोपेतून जागे केले. आईला तुझा हात दुखत असल्यामुळे बाम लावून देतो, असे म्हणत बाम लावतानाच नको ते चाळे केले.
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील एका गावात ४२ वर्षीय मद्यधुंद मुलानेच जन्मदात्या आईचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
४२ वर्षीय मुलगा दारूच्या आहारी गेला आहे. त्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी, मुलगा, मुलगी दोन वर्षांपूर्वी घर सोडून माहेरी गेले. त्यामुळे घरात विधवा म्हातारी आई आणि मुलगाच राहतात. शुक्रवारी मुलगा दिवसभर दारू ढोसत होता. रात्री १ वाजेच्या सुमारास तो घरी परतला. त्याने आईला झोपेतून जागे केले. आईला तुझा हात दुखत असल्यामुळे बाम लावून देतो, असे म्हणत बाम लावतानाच नको ते चाळे केले. त्याने निर्लज्जपणाचा कळस गाठला.
चक्क जन्मदात्या आईवर अतिप्रसंग करण्याचा मुलाने प्रयत्न केला. त्यामुळे त्याची आई जिवाच्या आकांताने ओरडली. म्हातारी ओरडल्याने मुलाने वरण घोटण्याच्या रवीने तिच्या डोक्यावर, हातावर वार केले. ती जखमी झाली. मुलाने तिला या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
तोपर्यंत तिच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी धावून आले. लोकांनी नराधम मुलाच्या हातून आईची सुटका केली. शनिवारी आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मुलाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केली.