दारूच्या नशेत बसचालकाचा धिंगाणा
By admin | Published: September 3, 2016 12:30 AM2016-09-03T00:30:18+5:302016-09-03T00:30:18+5:30
अमरावतीवरुन हैद्राबादला जाणाऱ्या पांढरकवडा आगाराच्या एस.टी.बसवर ड्युटी लावण्यात आलेल्या बस चालकाने चक्क दारुच्या नशेत
प्रवासी वेठीस : पांढरकवडा एसटी आगारातील घटना
पांढरकवडा : अमरावतीवरुन हैद्राबादला जाणाऱ्या पांढरकवडा आगाराच्या एस.टी.बसवर ड्युटी लावण्यात आलेल्या बस चालकाने चक्क दारुच्या नशेत येथील एस.टी.बसस्थानकावर धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान आगार व्यवस्थापकाने या बसवर दुसऱ्या चालकाची पर्यायी व्यवस्था करुन ही बस हैद्राबादसाठी रवाना केली. या प्रकारामुळे ताटकळत बसलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
पांढरकवडा आगाराची अमरावती-हैद्राबाद ही बस नेहमीप्रमाणे अमरावतीवरुन बुधवारी रात्री ९.३० वाजता पांढरकवडा बस स्थानकावर आली. पांढरकवड्यावरुन या गाडीचा चालक बदलत असून हैद्राबादपर्यंत दुसऱ्या चालकाची ड्युटी लावण्यात येते. त्यानुसार पांढरकवड्यावरुन हैद्राबादला जाण्यासाठी दुसऱ्या चालकाची ड्युटी लावण्यात आली. एम.एच.४०- वाय ६२०१ या क्रमांकाची पांढरकवडा आगाराची ही बस रात्री ९.३० च्या दरम्यान पांढरकवड्याला आली. अमरावतीवरुन बस घेऊन येणाऱ्या या बस चालकाची पांढरकवडा येथे आल्यानंतर ड्युटी संपल्यामुळे येथून हैद्राबादला जाण्यासाठी दुसऱ्या चालकाला ही बस घेऊन हैद्राबादला जायचे होते. त्यानुसार ज्या चालकाची ड्युटी लावण्यात आली तो दुसरा चालक रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बस स्थानकावर आला. मात्र तो यथेच्छ दारु ढोसलेल्या अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्याची अवस्था एवढी बिकट होती की, तो बसच्या कॅबीनमध्येही व्यवस्थित चढू शकत नसल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या बसमध्ये २५ ते ३० प्रवासी बसलेले होते. प्रवाशांना आपला बस चालक दारुच्या नशेत तर्र असल्याचे दृश्य दिसताच त्यांनी आरडा-ओरड केली. या दारुड्या चालकाच्या हातात बस देऊ नका म्हणून तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यास सांगितले. परंतु तो कोणाचेच ऐकत नव्हता. उलट प्रवाशांनाच शिवीगाळ करीत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दारुच्या नशेत तर्र असलेला व प्रवाशांच्या जीवाशी खेळायला निघालेला हा बसचालक आता कुणाचेच ऐकत नाही, हे पाहुन गाडीतील काही प्रवाशांनी आगार प्रमुख व यवतमाळ येथील विभाग नियंत्रकाला भ्रमणध्वनीव्दारे माहिती दिली. विभागीय नियंत्रकांनी आगार प्रमुखांना सुचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, आगार प्रमुख एस.बी.डफडे व काही कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले. परंतु काही वेळातच दारुच्या नशेत तर्र असलेला तो चालक तेथून पसार झाला.
या बसमध्ये आदिलाबाद, हैद्राबादला जाणारे अनेक प्रवासी होते. अखेर प्रचंड मनस्ताप झालेल्या काही प्रवाशांनी खासगी गाड्यांनी येथून पुढचा प्रवास केला. उर्वरित प्रवाशांसाठी आगार प्रमुखांनी आठवडी विश्रांतीवर असलेल्या बी.टी.चव्हाण या चालकाला आठवडी विश्रांती रद्द करुन हैद्राबाद गाडीवर पाठविले व पर्यायी व्यवस्था केली. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या गोंधळात प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. (तालुका प्रतिनिधी)
चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल -आगार प्रमुख
कर्तव्यावर जात असतांना मद्यप्राशन करुन येणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे असून मद्यप्राशन करुन आलेल्या निरंजन खडकीकर याबसचालकावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पांढरकवडा आगाराचे आगार प्रमुख एस.बी.डफडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आपल्याला हा प्रकार कळताच आपण क्षणाचाही विलंब न करता तातडीने बसस्थानकावर पोहोचलो. लगेच दुसऱ्या चालकाला हैद्राबाद गाडीवर पाठवून पर्यायी व्यवस्था केली, असे ते म्हणाले. मद्यप्राशन करुन आलेला बसचालक तेथून पसार झाल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.