पोळ्यावर सुखाचा पाऊस
By admin | Published: September 1, 2016 02:29 AM2016-09-01T02:29:53+5:302016-09-01T02:29:53+5:30
सुरुवातीला शेतकऱ्यांची दाणादाण करून महिनाभरापासून वरुणराजा रुसून बसला. खरिपाची पिके तहानली.
वरुणराजा पावला : घुंगरमाळा वाजे खळखळा, आज आहे बैलपोळा
रूपेश उत्तरवार यवतमाळ
सुरुवातीला शेतकऱ्यांची दाणादाण करून महिनाभरापासून वरुणराजा रुसून बसला. खरिपाची पिके तहानली. पीक करपण्यास सुरुवात झाली. अशातच शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा पोळा सण तोंडावर आला. शेतातील पीक पाहून शेतकऱ्याचे पोळ्याच्या खरेदीत मनच लागत नव्हते. अखेर महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर पोळ्याच्या सणावर सुखाचा पाऊस बरसला आणि बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बाजारात शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी झाली.
सतत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पहिल्यांदाच सुरुवातीला समाधानकारक पाऊस बरसला. काही ठिकाणी अतिपावसाने जमीन चिबडली. परंतु याही परिस्थितीत शेतकरी सुखावला होता. यंदा अमाप पीक होईल, अशी आशा होती. मात्र आॅगस्ट पहिल्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविली. आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. तीन आठवडे झाले तरी पावसाचा पत्ता नव्हता. ओलित करण्यात वीज वितरणचा अडथळा येत होता. अशातच पोळा सण तोंडावर आला. मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हते. शेतात फेरफटका मारला की त्याला करपणारे पीक दिसत होते. अशा बिकट स्थितीत पोळ्याचा साज खरेदी करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला होता. मात्र गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अचानक ढगाळी वातावरण झाले. मंगळवारी दुपारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोयाबीनला जीवदान मिळाले. बुधवारीही ढगाळ वातावरण निर्माण होवून काही ठिकाणी पाऊस बरसला. परिणामी शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पोळ्याच्या सणाला समाधानाची झुल शेतकऱ्यावर चढविली गेली.
पोळा दोन दिवस होणार साजरा
महाराष्ट्रीय सण-उत्सव साजरा करताना मराठी तिथीचा अवलंब केला जातो. संपूर्ण सण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन प्रमुख बाबींवर अवलंबून असतात. सूर्याने पाहिलेले पहिली तिथी ग्राह्य धरली जाते. यातूनच सण-उत्सव साजरे होतात. ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजतापासून अमावसेला प्रारंभ झाला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पोळा कोणत्या दिवशी साजरा करावा, अशा द्विधा मनस्थितीत सापडले होते. काही ठिकाणी बुधवारी पोळा साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी गुरुवारी पोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवस पोळ्याची धूम दिसणार आहे.
झडत्यांची व्हॉट्सअॅप धूम
पोळा म्हणजे कष्टकऱ्यांच्या सन्मानाचा सण. या सणाला श्रमाचे प्रतिक असलेल्या बैलाची पूजा केली जाते. अलिकडे सोशल मीडियाही सण-उत्सवात आघाडीवर दिसत आहे. व्हॉट्सअॅपवर मंगळवारपासूनच झडत्यांची धूम दिसत आहे. ग्रामीण टच असलेल्या नेटीजन्सने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झडत्या वायरल केल्या आहे. कधीकाळी केवळ पोळ्याच्या तोरणासमोर म्हणणाऱ्या झडत्या आता सोशल मीडियातून फिरू लागल्या आहे.
अखेरच्या दिवशी बाजारात गर्दी
सतत दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी यंदाही महिनाभरापासून दुष्काळाच्याच सावटात होता. महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी अस्वस्थ झाला होता. मात्र पोळ्याच्या दोन दिवस आधीपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठ गाठली. अखेरच्या दिवशी खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजारपेठेमध्ये दिसत होती.