खत रॅक पॉईंटचे भीजत घोंगडे
By admin | Published: June 9, 2014 11:52 PM2014-06-09T23:52:12+5:302014-06-09T23:52:12+5:30
गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे. खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही.
वणी : गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे. खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही.
परिसरातील शेतकर्यांच्या सोयीसाठी कायर येथील खताचा रॅक पॉईंट प्रस्तावित होता. कायरला खत उतरल्यास या परिसरातील शेतकर्यांना खत मिळणे सहज, सोपे आणि कमी खर्चाचे झाले असते. गेल्या चार वर्षांपूर्वी कायर येथील या खत रॅक पॉईंटला मंजुरी मिळाल्याचे खासदार हंसराज अहीर यांनी सांगितले होते. आता त्याला चार वर्षे लोटली आहेत. त्यावर्षी नाही तर किमान दुसर्या, तिसर्या वर्षी हा रॅक पॉईंट अस्तित्वात येईल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती. मात्र आता चार वर्षे लोटूनही हा रॅक पॉईंट प्रत्यक्षात आलाच नाही. कायर येथे अद्याप खत उतरलेच नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा आता पूर्णपणे मावळल्या आहेत.
जिल्हय़ाला धामणगाव येथील रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा होतो. वणीलगतच्या चंद्रपूर येथेही खतासाठी रॅक पॉईट देण्यात आला आहे. धामणगाव येथून येणार्या खतावरच वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकर्यांना अवलंबून राहावे लागते. धामणगाव ते वणी हे अंतर जवळपास दीडशे किलोमीटर आहे. तेथून वणी, मारेगाव, पंढरकवडा, झरी तालुक्यातील कृषी केंद्र चालकांना खत आणावे लागते. त्यासाठी त्यांचा प्रवास खर्च वाढतो. या वाढीव प्रवास खर्चाचा भार अखेर शेतकर्यांवरच येऊन पडतो.
धामणगाव येथून खत आणण्यासाठी जादा वेळही लागतो. परिणामी वेळेवर खत उपलब्ध होईल की नाही, अशी साशंकता शेतकर्यांना असते. धामणगावचे अंतर, वेळ, वाहतूक खर्च या सर्व बाबी विचारात घेऊनच कायर येथे रॅक पॉईंट देण्याची मागणी शेतकर्यांकडून होत होती. त्याच अनुषंगाने खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे कायर येथे रॅक पॉईंट देण्याची मागणी केली होती. रेल्वेने ती मंजूर केल्याचे खासदारांनीच जाहीर केले होते. तसे पत्रही त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना दाखविले होते. हा रॅक पॉईंट आपणच खेचून आणल्याचा दावाही त्यांनी केला होता. आता त्याला चार वर्षे लोटली. मात्र कायरचा रॅक र्पाईंट कागदावरून अद्याप पुढे सरकलाच नाही.
आता खरीप हंगाम सुरू होत आहे. शेतकरी खतासाठी धावाधाव करीत आहे. त्यांना चढय़ा दराने खत खरेदी करावे लागत आहे. मात्र खासदारांना त्याचे कोणतेच सोयरसुतक दिसून येत नाही. कायर येथे खत साठविण्यासाठी गोदामाची व्यवस्था नसल्याने रॅक पॉईंट रखडल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासन अडवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात येतो. दुसरीकडे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही हा रॅक पाईंट कॉंग्रसनेच आणल्याचे सांगितले होते. तेही आता मूग गिळून आहे. त्यामुळे शेतकरी मात्र वार्यावर सापडले आहे.
कायर येथील रेल्वे स्थानकात मात्र सिमेंटची पोती सर्वत्र दिसतात. सिमेंट कंपन्या तेथूनच संपूर्ण रेल्वेत सिमेंटची पोती भरून तेथून दुसरीकडे पाठवितात. सिमेंट तेथे उतरत असताना, खत का उतरू शकत नाही, असा प्रश्न आहे. सिमेंट तर थोडे जरी पाणी लागले तरी वाया जाऊ शकते. तरीही सिमेंट कंपन्या तेथे सिमेंटची पोती उतरवितात. त्याचप्रमाणे तेथे खत उतरविणेही शक्य आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)