मुलाच्या लग्नपत्रिका वाटताना वडिलांवर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:24 PM2019-04-02T22:24:03+5:302019-04-02T22:25:12+5:30
कार्यालय सुटल्यानंतर मुलाच्या लग्नपत्रिका वाटायला निघालेल्या वडिलाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास साखरा (ता.घाटंजी) गावाजवळ घडली. सुरेश किसन हजारे (रा.जरंग) असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रुंझा : कार्यालय सुटल्यानंतर मुलाच्या लग्नपत्रिका वाटायला निघालेल्या वडिलाचा अपघातीमृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास साखरा (ता.घाटंजी) गावाजवळ घडली. सुरेश किसन हजारे (रा.जरंग) असे मृताचे नाव आहे.
रुंझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते शिपाई पदावर कार्यरत होते. सोमवारी कार्यालय सुटल्यानंतर ते राहते गाव जरंग येथे गेले. घरून लग्नपत्रिकेचा गठ्ठा सोबत घेतला. घाटंजीवरून पारवा मार्गे जात असताना संध्याकाळी ६.३० च्या सुमारास साखरा गावाजवळ एम. एच. २९/टी-६९१० या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला (एम.एच.२९/बीए-०७८१) धडक दिली. यात सुरेश हजारे यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. राष्ट्रसंतांचे ते सेवक होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलाचा विवाह २८ एप्रिल रोजी होत आहे.
दरम्यान सुरेश हजारे यांचे अपघाती निधन झाल्याने लग्नघरात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या घाईगडबडीत गुंतलेली मंडळी या वृत्ताने हादरुन गेली आहे.
दरम्यान या अपघाताबाबत गजानन शामराव धाबेकर रा. जरंग यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून घाटंजी पोलिसांनी मालवाहू वाहनाचा चालक अविनाश वसंंता मेश्राम रा. साखरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.