कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:05 PM2018-02-28T22:05:03+5:302018-02-28T22:05:03+5:30

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे.

Due to the drop in cotton prices, the farmers suffer | कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देघरातच साठवणूक : अनेकांना त्वचारोगाची लागणी, आरोग्यावरील खर्चात झाली वाढ

ऑनलाईन लोकमत
हिवरी : परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. खरीप हंगामात उधार, उसनवारीवर पैसे आणून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त केले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरविला. त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाले. कपाशीच्या उतारीतही घट आली. महागडे बियाणे घेवून लागवड केलेल्या कापसाचा खर्च निघनेही कठीण झाले. मात्र निसर्गाने शेतकºयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.
सर्व संकटांना पार करीत शेतकऱ्यांनी कापूस वेचाई केली. तत्पूर्वी उधारीवरच कीटकनाशकांची फवारणी केली. दर वाढण्याच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. मात्र आता बाजारात दर घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शेतकऱ्यांनी घरी साठवून ठेवलेल्या कापसामुळे त्वचारोगाची लागण होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे. या सर्व बाबींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाकडूनही कोणतीच उपाययोजना केली जात नाही. राज्य शासनाने कापसाला वाढीव भाव देवून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोणबेहळ परिसरातील शेतकऱ्यांचा घात
लोणबेहळ : कापसाचे दर सतत कमी होत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. यावर्षी लोणबेहळ परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र अपुऱ्या पावसामुळे आणि नंतर आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले. दरवर्षीपेक्षा उत्पादन निम्यावरच आले. उत्पादन कमी झाल्याने किमान भाव तरी चांगले मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेकांनी चांगल्या प्रतीचा कापूस घरातच भरून ठेवला होता. मात्र आता कापसाचे भाव दररोज घसरत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या कापसाला योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Due to the drop in cotton prices, the farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस