दुष्काळग्रस्त गावाचं शिवार पाणीदार झालं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 09:30 PM2019-05-18T21:30:45+5:302019-05-18T21:31:03+5:30
सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ:सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले. याला केवळ गावकऱ्यांचे श्रमदान आणि सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत ठरला. त्यातूनच हे दुष्काळग्रस्त गाव आज पाणीदार झाले आहे.
या गावाने गतवर्षी पावसाळ्यापूर्वी श्रमदानातून आठ हजार ६६६ घनमीटरचे काम केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी १६६ शोषखड्डे केले. यंत्राच्या मदतीने एक लाख १४ हजार ६४६ घनमीटरचे काम करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात १२ कोटी ६१ लाख लिटर पाण्याचा साठा झाला. या जलसमृद्धीने गावात आज आटलेल्या विहिरींनाही पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिवारात इतके खेळते पाणी आजपर्यंत पाहिले नव्हते, असे मत गावकरी व्यक्त करतात. भूजल स्त्रोतातही सुधारणा झाली. विहिरींना मोठ्या प्रमाणात झरे खेळते झाले. यातून ओलित वाढले. यावर्षी गावातले स्थलांतर कमी होण्यास मोलाची मदत लाभली. गावातच अनेकांना रोजगार मिळाला.
दगडांचं गाव टँकरमुक्त
डोंगरमाथ्यावर वसलेले तोरणाळा गाव दगडांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावाला नागालँड अशी ओळख मिळाली होती. दगडामुळे गावात पाणी नाही. यातून गावात सहा महिने टँकर लागलेलेच असायचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागत होता. दुष्काळी स्थितीत या गावातील २५ जनावरे पाण्यावाचून मेली. मात्र वॉटरकप स्पर्धेने आज या गावाच्या शेतशिवारात मुबलक पाणी आहे.
लहान, थोरांच्या पुढाकाराने शिवार हिरवेगार
गावशिवारातील पाण्याचा प्रत्येक स्रोत गतवर्षीपर्यंत कोरडा पडत होता. मात्र लहान-थोरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रत्येक स्रोताला पाणी आले. विविध प्रकारचे शेती उत्पादन या पाण्यावर घेतले जाऊ लागले. संपूर्ण शिवार हिरवेगार झाले. भाजीपाला, फळे याशिवाय दुबार पिकेही या भागात घ्यायला सुरुवात झाली.
पाणीदार गावासाठी गावकरी आपल्या परीने युद्धपातळीवर काम करीत आहे. जलयुक्तशिवारमधून शासनाने काम दिल्यास हे गाव आदर्श ठरेल.
- शेषराव राठोड
माजी सरपंच, तोरनाळा
गावकºयांच्या योगदानाने गावात हिरवे स्वप्न साकार करता आले. गावकºयांनी श्रमदानात भरपूर योगदान केल्यामुळे पाण्याचा आज सुकाळ झाला.
- बेबी राठोड
सरपंच, तोरनाळा