शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

By admin | Published: July 5, 2014 01:37 AM2014-07-05T01:37:21+5:302014-07-05T01:37:21+5:30

गेल्या २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

Due to drought over farmers | शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

Next

वणी : गेल्या २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी २६ हजार शेतकरी अडचणीत सापडले असून ३० हजार हेक्टरवरील पिकेही धोक्यात सापडली आहेत.
यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत मिळाल्याने सुरूवातीला शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण करून पेरणीकडे लक्ष केंद्रित केले होते. तालुक्यात ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडी योग्य आहे. त्यापैकी ४६ हजार ३७0 हेक्टरवर कपाशीच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मागील वर्षी ४२ हजार ३३८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. मात्र पावसाने दगा दिल्याने नियोजित क्षेत्रातही अद्याप पेरणी पूर्ण होऊ शकली नाही. आजमितीस तालुक्यात ३0 हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे.
यावर्षी सोयाबीनचा पेरा कमी होऊन १० हजार ७९८ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ६०० हेक्टरवर तूर, एक हजार ५० हेक्टरमध्ये संकरित ज्वारी, तर २५ हेक्टरवर इतर पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने हे पूर्ण नियोजनच आता कोलमडले आहे. आजपर्यंत ३0 हजार हेक्टरवर कपाशी, तीन हजार हेक्टरवर तूर आणि ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र ही सर्वच पिके आता धोक्यात सापडली आहे.
तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यांची कुटुंबे याच शेतीवर अवलंबून आहेत. मात्र पावसाने दगा दिल्याने ही शेतकरी कुटुंबे आता संकटात सापडली आहे. तालुक्यात केवळ तीन ते चार हजार हेक्टरवरील कपाशी पिकेच सध्या बरी आहेत. उर्वरित जवळपास २६ हजार हेक्टरवरील कपाशी संकटात सापडली आहे. अनेक शेतकरी कपाशीला जगविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. काहींनी ठिबक तुषार सिंचनाव्दारे कपाशीला पाणी देणे सुरू केले आहे. मात्र भारनियमन आणि विजेच्या लपंडावाने त्यांना ओलित करणेही अशक्य झाले आहे.
वणी तालुक्यात मोजकेच क्षेत्र सिंचनाखाली आहे. बहुतांश शेती निर्सगाच्या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मात्र पावसानेच दगा दिल्याने आता त्यांच्याच डोळ्यात अश्रू तरळत आहे. २६ हजार शेतकऱ्यांची कुटुंबे डोळ्यात पाणी साठवून पावसाची वाट बघत आहेत. मात्र पाऊस निराशा करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांवर आता कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. मागील वर्षी अतिव्ष्टीने घात केला अन् यावर्षी आता पावसाने दगा दिल्याने जगाचा पोशिंदाच हतबल झाला आहे. दुबार पेरणीसाठी आता आर्थिक तजवीज करण्याच्या प्रयत्नात बळीराजा आता मेटाकुटीस आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Due to drought over farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.