कर्मचारी संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:02 AM2018-08-08T00:02:42+5:302018-08-08T00:04:06+5:30
सातवा वेतन आयोग व महागाई भत्ता यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आदींनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सातवा वेतन आयोग व महागाई भत्ता यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आदींनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला.
तीन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी वणी येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. ग्रामीण भागातील नागरिकांना या संपाची कल्पना नसल्याने शासकीय कामासाठी आलेल्या अनेकांना मंगळवारी आल्यापावली परत जावे लागले. संपामध्ये अनेक कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला. कार्यालयाची दारे उघडी असली तरी आत मात्र शुकशुकाट दिसून आला. संप असल्याने अनेक अधिकाऱ्यांनीही कार्यालयाला ‘दांडी’ मारल्याचे दिसून आले.
शासकीय रुग्णालयीन कर्मचारीदेखील संपात सहभागी असल्याने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले. मारेगाव तालुक्यात संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. संपाला समिश्र प्रतिसाद होता. तहसील कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. झरी तालुक्यात मात्र संपाचा फारसा फटका बसला नाही. सर्व कामकाज सुरळीत सुरू होते. त्यामुळे नागरिकांची कामे झालीत. या संपाला विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असून त्यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही दिले आहे.