घानमुख येथे अतिवृष्टीमुळे मातीबांध वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:43+5:302021-08-19T04:45:43+5:30
बिजोरा : महागाव तालुक्यात मंगळवारी (दि. १७) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे घानमुख सिंचन तलाव ओसंडून वाहू लागला. पाण्याच्या जोरदार ...
बिजोरा : महागाव तालुक्यात मंगळवारी (दि. १७) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे घानमुख सिंचन तलाव ओसंडून वाहू लागला. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सांडव्यालगतचा मातीबांध पूर्णतः वाहून गेला आहे.
सांडव्याच्या बांधकामाला गळती तयार झाली आहे. पाण्यामुळे त्या खालील शेती खरडली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सिंचन विभागाने घानमुख तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करून सांडव्याच्या पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा व भविष्यातील नुकसान टाळावे, अशीही मागणी होत आहे.
सन २००३ मध्ये हा तलाव पूर्णत्वास आला. तेव्हापासून आजतागायत सांडव्यामधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने मातीबांधाचे नुकसान झाले नव्हते; परंतु मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांडव्याचा बांध वाहून गेला. त्यामुळे सांडव्याच्या पाण्याचा प्रवाह बदलला गेला, असे देविदास मोहकर यांनी सांगितले.
कालव्याच्या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी सांडव्याला जॅकेटिंग करणे, गाईडवॉल प्रोव्हाईड करणे, टेल चॅनलचे खोदकाम करणे, आदी कामांचे प्रस्ताव एक वर्षापूर्वीच मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्या कामांना मंजुरी मिळाल्यावर काम करू, असे उमरखेडचे जलसंधारण अधिकारी विवेक पिंपोले यांनी स्पष्ट केले.
180821\img_20210818_113930.jpg
अतिवृष्टीमुळे तलावाच्या पाण्याने सांडव्याचा मातीबांधा वाहून गेला