हटखोर पावसामुळे जिल्ह्यात अर्धी पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:08 PM2019-07-22T22:08:46+5:302019-07-22T22:09:39+5:30
मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोळपली आहे. जवळपास ३० टक्के पेरणी पूर्णत: नष्ट झाल्याचा अंदाज कृषी खात्याकडून वर्तविला जात आहे.
हमखास पाऊस बरसणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. यावर्षीच्या पावसाने ही ओळख पुसून काढण्याचेच काम सुरू केले आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाच संकटात सापडला आहे. याची सर्वाधिक झळ शेतकरी कुटुंबाला बसली आहे. कृषी उत्पादनात घट होण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
विपूल निसर्ग संपदा लाभलेला जिल्ह्याला वरूणराजाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाºया जून, जुलै महिन्यातच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पीक जगवायचे तरी कसे असा प्रश्न प्रत्येकांपुढे उभा ठाकला आहे. या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाकडे साकडे घातले आहे.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब चिंतेत आहेत. पाऊस बरसावा इतकीच विनंती ते वरूण राजाला करीत आहे. काही मोजक्या गावामध्ये पाऊस बरसला. अनेक ठिकाणी हा पाऊस बरसलाच नाही. यामुळे काही ठिकाणी पिके वाचली तर अनेक ठिकाणी पिके करपली, असे विरोधाभासी चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.
जुलै आणि आॅगस्टचा पाऊस महत्त्वाचा
साधारणता जूनमध्ये १५० मिमी, जुलै आणि आॅगस्टमध्ये प्रत्येकी ३५० मिमी पाऊस बरसतो. जून ते जुलैपर्यंत १३९ मिमी इतकाच पाऊस यावर्षी आला आहे. जुलैमध्ये पावसाची मोठी उघडीप राहिली. सर्वाधिक पाऊस पडणाºया महिन्यातच पाऊस गायब आहे. यामुळे भविष्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणे भरणार किंवा नाही हे सांगणे अवघड झाले आहे. एकूणच विदारक चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.