वाघांची संख्या वाढल्याने वनवर्तुळ तणावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:11 AM2018-10-04T00:11:08+5:302018-10-04T00:11:37+5:30
पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यातील काही बछडे हे टिपेश्वर अभयारण्यात वास्तव्याला आहेत.
‘वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत’ असा दावा भलेही वनविभाग करीत असला तरी वनविभागाअंतर्गत येणाºया जंगलांलगत गावांची संख्या मोठी आहे. टिपेश्वर अभयारण्यापेक्षा बफर झोनमध्येच वाघांचा अधिवास अधिक असल्याची माहिती वनविभागातील सुत्राने दिली. गेल्या काही महिन्यात एका नरभक्षी वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्यजीव व वनविभागाबद्दल प्रचंड रोष आहे. हा रोष कमी करण्यासाठी वनविभागाने राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीला पकडण्यासाठी मोठी फिल्डींग लावली असली तरी अद्याप ती वाघिण वनविभागाच्या जाळ्यात अडकली नाही. तिच्यासोबत तिचे दोन बछडे व वाघ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे केवळ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची कसरत सुरू आहे. तिला पकडण्यासाठी मोठा लावाजमा उभा करण्यात आला आहे. असे असले तरी नरभक्षी वाघिण या लावाजम्याला सातत्याने गुंगारा देत आहे.
पांढरकवडा वनविभागाअंतर्गत पांढरकवडासह राळेगाव, मारेगाव, झरी, घाटंजी, वणी, आदी तालुके येतात. टिपेश्वर अभयारण्यातील अन्नसाखळी तुटल्याने तृणभक्षी प्राणी या अभयारण्याबाहेर पडल्याचे सांगण्यात येते. वाघाचे खाद्य तृणभक्षी प्राणीच असल्याने या प्राण्यांच्यामागे वाघही जंगलाबाहेर पडलेत. त्यातून वाघ आणि मानव संघर्षाची ठिणगी पडली. सध्या पांढरकवडा वनविभागाअंतर्गत १८ ते २० बछडे असून येत्या काही महिन्यात ते मोठे होऊन आईपासून दूर होणार आहेत. त्यामुळे वनविभागाची चिंता आणखी वाढली आहे. जंगलाला लागून अनेक गावे असून या गावातील नागरिकांचा जंगलाशी संबंध येतो. झरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून अनेक लोकांची शेती थेट जंगलातच आहे. वाघाचे दर्शन झाल्यानंतर शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरतात. आता पुन्हा वाघांची संख्या वाढल्याने परिस्थिती धोकादायक बनण्याची भीती जंगलालगतच्या गावामधील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
वाघांची संख्या वाढत असली तरी पांढरकवडा वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येने कोणती अडचण निर्माण होईल असे वाटत नाही. ज्या दुर्दैवी घटना घडल्या, त्यातील ९० टक्के घटना जंगल भागातच घडल्या आहेत. वन्यजीवांसाठी जंगल क्षेत्र कमी पडते अथवा जास्त आहे, हा तांत्रिक मुद्दा असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही.
- संगीता कोकणे, आरएफओ, पांढरकवडा.