ढेपीचे भाव वाढल्याने दूध व्यावसायिक अडचणीत
By admin | Published: August 17, 2016 01:13 AM2016-08-17T01:13:39+5:302016-08-17T01:13:39+5:30
सरकीपासून तयर होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
पुसद : सरकीपासून तयर होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. प्रती क्विंटल ८०० ते १००० रुपयांची ही भाववाढ असून, व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अचानक झालेली ही भाववाढ कमी करून साठेबाजांवर योग्य कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय हा शेतीला प्रमुख जोडधंदा आहे. या जोडधंद्याच्या भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व दूध विक्रेत्यांना भाववाढीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अशातच जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्यात येणाऱ्या ढेपीची भाववाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ढेपीचे ६० किलोचे पोते एरवी १३०० ते १४०० रुपयाला मिळत होते.परंतु गेल्या महिन्यापासून ढेपेचे भाव २००० ते २२०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. पुसद येथे अकोला, अमरावती, खामगाव, जालना येथून ढेपेची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. जाड व बारीक अशा दोन प्रकारात ढेप येत असल्याने दूध वाढीसाठी पोषक आहार म्हणून ढेपेकडे पाहिले जाते.
पुसद तालुक्यात दर महिन्याला तब्बल १६०० ते २००० पोत्यांची विक्री होत असते परंतु अचानक झालेल्या भाववाढीमुळे पशुपालकांनी ‘कॅटलफीड’ घेण्याकडे कल दाखविला आहे. २००० रुपयांचे ढेपेचे पोते घेण्यापेक्षा पशुपालकांनी ६०० ते १००० रुपयांपर्यंत मिळणारी कांडी घेणे पसंत केले आहे. भाववाढीमुळे पशुपालकांनी दुग्धव्यावसायिकांनी मका चुनी, तुवर चुनी, कांडी असे विविध प्रकारचे कॅटलफीड वापरण्यास पसंती दिली आहे. ढेपेची खरेदी कमी झाल्याने व्यावसायावर तब्बल ७५ टक्के परिणाम झाला आहे.
एकीकडे शासनाने गोहत्या बंदी केली आहे. त्यामुळे कशाही परिस्थितीत जनावरांना जगवावे लागत आहे. नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणा यामुळे आधीच शेतकरी पिचला आहे. त्यातून आत्महत्या होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)