जेवणाने केला घात, पोलिसाचा मारेकरी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:12 PM2018-12-17T22:12:40+5:302018-12-17T22:12:54+5:30
मारेगावच्या सहायक फौजदाराचा खून केल्यानंतर पसार झालेला आरोपी अनिल मेश्राम अनेक दिवस जंगलात आश्रयाला होता. गुराखी असल्याने त्याला जंगलाचा अभ्यास होता. तुरीच्या शेंगा, कंद-मूळ खाऊन त्याने दिवस काढले. मात्र त्याला भूक असह्य झाली होती. म्हणून तो जेवणाच्या शोधात गावात शिरला आणि या जेवणानेच त्याचा घात केला.
देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : मारेगावच्या सहायक फौजदाराचा खून केल्यानंतर पसार झालेला आरोपी अनिल मेश्राम अनेक दिवस जंगलात आश्रयाला होता. गुराखी असल्याने त्याला जंगलाचा अभ्यास होता. तुरीच्या शेंगा, कंद-मूळ खाऊन त्याने दिवस काढले. मात्र त्याला भूक असह्य झाली होती. म्हणून तो जेवणाच्या शोधात गावात शिरला आणि या जेवणानेच त्याचा घात केला. मंदिरात जेवत असताना पांढरकवडा पोलिसांनी आरोपी अनिलला सापळा रचून अटक केली. मात्र तेथेही त्याने पोलिसांवर हल्ल्याची संधी सोडली नाही. आधीच त्याच्या हल्ल्यात एका पोलिसाचा जीव गेला असताना त्याने पुन्हा पोलिसांवर हल्ला चढविला. यावरून त्याच्या मनात पोलिसांवर भीती नव्हे, उलट राग असल्याचे दिसले.
२५ नोव्हेंबरच्या रात्री अटकेसाठी आलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेथे यांचा खून करून आरोपी अनिल पसार झाला होता. घरुन पळून जाताना त्याने कपडे व माचीस सोबत नेली होती. जंगलात रक्ताने माखलेले कपडे टाकून देऊन त्याने एका नाल्यावर आंघोळ केली, सोबत आणलेले कपडे घातले व तो जंगलातच भटकंती करू लागला. बराच काळ तो आंबेझरी परिसरातील जंगलात होता. या दरम्यान त्याला तीन वेळा पोलीस दिसले. मात्र त्याने झाडीत आश्रय घेतल्याने तो पोलिसांच्या नजरेत आला नाही. नातेवाईकांशी पटत नसल्याने त्याने कुणाकडे जाण्याचा विचारही केला नाही. पोटाची आग विझविण्यासाठी तो तुरीच्या शेंगा, कंद-मूळ खायचा. संध्याकाळी दाट जंगलात विस्तव करून थंडीपासून बचाव करायचा. दिवसा सुरक्षित वाटेल ते झोप काढायचा. पोलीस आपल्या मागावर आहेत, याची कल्पना त्याला होती. मात्र भुकेची आग त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अशाच स्थितीत तो १२ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच जंगलाबाहेर पडला. महाडोळी या गावातील मनुष्य वस्तीत तो फिरला. वास्तविक तेथेच त्याचा घात झाला. तेथूनच पोलिसांचे खबरे त्याच्या मागावर होते. त्या दिवशी त्याने गावात भीक मागून जेवण केले. त्यानंतर आपण कोण आहोत याची माहिती गावातील एका-दोघांना दिली. गावातून अनिलची कुणकुण लागल्याने वणीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पथके त्या भागात सक्रिय झाली होती. रविवारी १६ डिसेंबर रोजी आरोपी झरी तालुक्यातील हिवरा (बारसा) या गावात पोहोचला. तेथे तो विठ्ठल रुख्मिणी मंदिरात रात्री ९ वाजता जेवण करीत असल्याची टीप वणीचे एसडीपीओ विजय लगारे यांच्या पथकाला देण्यात आली. टीप देणाऱ्याने ‘तुम्ही तत्काळ पोहचा, आम्ही त्याला जेवणात गुंतवितो’ असे सांगितले. त्यामुळे मारेगाव पोलिसांना हिवरा येथे पोहोचायला वेळ लागेल, तोपर्यंत आरोपी पसार होऊ शकतो याचा अंदाज घेऊन तत्काळ आरोपीच्या अटकेसाठी पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी, ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात फौजदार रवी वाहुळे, मंगेश भांगाडे, शब्बीर पठाण यांच्या नेतृत्वात जमादार नाकतोडे, विठ्ठल बुरुजवाडे, सुहास मंदावार, सचिन मारकाम, अंकुश बहाळे, चालक रिजवान शाह या पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. पांढरकवडा पोलीस पोहोचले तेव्हा आरोपी अनिल जेवण करून पसार होण्याच्या तयारीत होताच. मात्र पोलिसांनी त्याला वेढा घातला व त्याला शरण येण्यास सांगितले. मात्र त्याने त्याही अवस्थेत आपल्या जवळील काठीने पोलिसांवर पुन्हा जोरदार हल्ला चढविला. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. इतरांनी हल्ला परतवून व वाजवी बळाचा वापर करून अनिलला ताब्यात घेतले. जखमी पोलीस व आरोपी अनिलला पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याला अटक करून मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर अधिक तपास करीत आहे.
दरम्यान पोलिसाचा मारेकरी आरोपी अनिल मेश्राम अटक झाल्याचे वृत्त कळताच सोमवारी त्याला बघण्यासाठी मारेगाव पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
पश्चाताप नाहीच, उलट पोलिसांवर दुसºयांदा हल्ला
सोमवारी सकाळी झोपेतून उठल्यावर आरोपी अनिलने आपली आई कुठे आहे, माझी जनावरे कुठे आहेत, त्यांना चारायला कोण नेते, अशी विचारणा पोलिसांकडे केली. तेव्हा तुझी गाय मृत्युमुखी पडली असे त्याला सांगताच तो संतापला. माझी गाय कुणी मारली हे सांगा, असे तो विचारु लागला. आपल्या हातातून पोलीस कर्मचाºयाचा खून झाला, आपण दुसºयांदा पोलिसांवर हल्ला चढविला याचा कोणताही पश्चाताप त्याच्या चेहºयावर झळकत नव्हता.
आरोपी अनिल मेश्राम याला सोमवारी मारेगावचे ठाणेदार तथा तपास अधिकारी दिलीप वडगावकर यांनी वणी प्रथम श्रेणी न्यायालयापुढे उपस्थित केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.