आक्षेपार्ह पोस्टमुळे उमरखेडच्या शांततेला लागले गालबोट, वाहनांची केली तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:11+5:30
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तीन युवकांनी इन्स्टाग्राम ॲपवर लाइव्ह येऊन एका समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करीत व्हिडिओ प्रसिद्ध केला. काही क्षणातच तो व्हायरल झाला. त्यामुळे एका समाजाच्या भावना अनावर झाल्या. त्या समाजाच्या युवकांनी पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी शोधण्यात वेळ लागत असल्यामुळे सायंकाळच्या दरम्यान पुन्हा जमाव पोलीस ठाण्यात धडकला. नंतर परतताना रस्त्यातील शेकडो वाहनांच्या काचा फोडून नासधूस केली. एक ऑटोमोबाइल्स जाळले. एका हेअर सलूनची तोडफोड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरात शुक्रवारी सोशल मीडियावर एका धर्माबद्दल अपप्रचार असणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. यामुळे संतापाची लाट उसळून संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. तक्रार दाखल केल्यानंतर घरी परतताना संतप्त जमावाने अनेक दुकाने व वाहनांची तोडफोड केली. नाग चौकातील एका दुकानाला आग लावली. एक हेअर सलून फोडण्यात आले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तीन युवकांनी इन्स्टाग्राम ॲपवर लाइव्ह येऊन एका समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करीत व्हिडिओ प्रसिद्ध केला. काही क्षणातच तो व्हायरल झाला. त्यामुळे एका समाजाच्या भावना अनावर झाल्या. त्या समाजाच्या युवकांनी पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी शोधण्यात वेळ लागत असल्यामुळे सायंकाळच्या दरम्यान पुन्हा जमाव पोलीस ठाण्यात धडकला. नंतर परतताना रस्त्यातील शेकडो वाहनांच्या काचा फोडून नासधूस केली. एक ऑटोमोबाइल्स जाळले. एका हेअर सलूनची तोडफोड केली.
या घटनेत आठ चारचाकी वाहन, दोन तीनचाकी ऑटोरिक्षा, तर १० दुचाकींची तोडफोड झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी सकाळपासून बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. व्यापाऱ्यांनी घटनेबाबत प्रशासनाला निवेदनही दिले. घटनेनंतर शुक्रवारी रात्री आमदार नामदेव ससाने, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासह अन्य पक्षाच्या पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहायक पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे लक्ष ठेवून आहे.
गुन्हेगारांची गय केली जाणार नाही
n या घटनेतील परस्परविरोधी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष घडलेला नाही. इन्स्ट्राग्रामवर प्रसारित आक्षेपार्ह व जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट व्हायरल झाल्याने संतप्त समुदायाने पोलीस ठाण्यासमोर एकत्रित येऊन हिंदुबहुल वस्तीत जाऊन दुकाने, दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून संपत्तीचे नुकसान केले. नांदेड रोडवरील सुनील भराडे यांच्या मालकीचे ऑटो मोबाईलचे दुकान जाळले. यातील सातजणांना अटक केली आहे. यात १७ आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी केले.
हे तर आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र
- काळी दौलत खान येथील घटनेनंतर शहरात मतांचे तुष्टीकरण करण्याकरिता दोन समुदायांमध्ये भांडण लावून वातावरण बिघडविण्याचे कार्य करण्यात येत आहे. हे महाविकास आघाडीच्या विकासात्मक वाटचालीला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून, या घटनेमागील आणि घटनेत समाविष्ट असणाऱ्या कुठल्याही दोषींची गय केली जाऊ नये, मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करण्यात यावी, असे पोलिसांना निर्देश दिल्याचे आमदार संजय राठोड यांनी शनिवारी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.