सावंगीत एकाच कामाचे झाले दोनदा भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:38 AM2018-04-09T00:38:36+5:302018-04-09T00:38:36+5:30
श्रेय लाटण्यासाठी रस्त्यांचे भूमिपूजन किती वेळाही केले जाऊ शकते, मात्र यास्पर्धेत जिल्ह्याचे पालकमंत्री उतरल्याने वेगळीच कलाटणी मिळते.
दीपक वगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव(कसबा) : श्रेय लाटण्यासाठी रस्त्यांचे भूमिपूजन किती वेळाही केले जाऊ शकते, मात्र यास्पर्धेत जिल्ह्याचे पालकमंत्री उतरल्याने वेगळीच कलाटणी मिळते. सत्ताधारी शिवसेना व भाजपात असलेला कलगितुरा दोन वेळा झालेल्या भूमिपूजनाच्या प्रकारावरून उघडकीस आला.
जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक २ अंतर्गत ३०-५४ आणि २०-७२ मधून सावंगी ते करमाळा रस्ता डांबरीकरण मंजूर करण्यात आले. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य विनोद खोडे यांच्या हस्ते २१ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी सावंगीचे उपसरपंच नितीन आढवे, केशव जाधव, पाथ्रडदेवीचे सरपंच अंकुश ढाले, धर्मेंद्र जाधव, पुरुषोत्तम गावंडे, नरेंद्र जाधव, आमशेतचे सरपंच सिद्धार्थ बनसोड, अभियंता ताजने उपस्थित होते.
सावंगी-करमाळा रस्त्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते दुसऱ्यांदा २ एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात आले. एकाच कामाचे दोनवेळा भूमिपूजन झाल्याने निवडणूका जवळ आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
सावळा, सावंगी, पाथ्रडदेवी या परिसरात कामाना सुरुवात झाली आहे. मात्र यातील कामाचा दर्जा अतिशय सुमार आहे. कामाच्या गुणवत्तेकडे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष आहे. केवळ श्रेयासाठी राजकीय पुढाऱ्यांची धडपड आहे. एकाच कामाचे दोनवेळा भूमिपूजन करूनही गुणवत्तेसाठी मात्र कुणीच आग्रही राहात नाही. पालकमंत्र्यांनी केलेल्या कामाचाही दर्जा जोपासला जात नसेल तर यंत्रणा किती भ्रष्ट आहे याची प्रचिती येते.
दोनवेळा भूमिपूजन केल्याबाबत उपविभागीय अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क केला असत त्यांनी याबाबत कुठलिही कल्पना नसून चौकशी करून काय आहे ते सांगतो अशी प्रतिक्रीया दिली.