भीषण पाणीटंचाईतही बांधकामे जोरात

By Admin | Published: May 27, 2016 02:08 AM2016-05-27T02:08:35+5:302016-05-27T02:08:35+5:30

पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय

Due to severe water scarcity, construction of loud | भीषण पाणीटंचाईतही बांधकामे जोरात

भीषण पाणीटंचाईतही बांधकामे जोरात

googlenewsNext

खासगी आणि शासकीयसुध्दा : नगरपरिषद-प्राधिकरण मेहेरबान
यवतमाळ : पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय आणि खासगी बांधकामांवर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उच्च न्यायालयाने दुष्काळी भागात बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले असले तरी यवतमाळ शहरात मात्र ठिकठिकाणी बांधकाम सुरू आहे.
यवतमाळ शहरात कधी नव्हे ती यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निळोणा धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच धरण कोरडे पडले आहे. शहरात आठ दिवसाआड तेही जेमतेम पाणी मिळत आहे. शहरातील बहुतांश खासगी बोअरवेल आणि नगर परिषदेच्या मालकीचे बोअरवेलही कोरडे पडले आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी हाच चर्चेचा विषय आहे. थेंब न् थेंब साठविण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील बहुतांश भागात बांधकामांचा सपाटा आहे. यात शासकीय आणि खासगी बांधकामांचा समावेश आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर कंत्राटदार करीत आहे. तर नगरपरिषदेच्यावतीने नाल्या आणि सिमेंट रस्त्यांचे बांधकाम वेगात सुरू आहे. यासोबतच शहरात ठिकठिकाणी मोठ्ठाले अपार्टमेंट उभारण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यात ही कामे थांबतील, असे वाटत होते. परंतु आजही त्याच गतीने शहरातील खासगी बांधकामे सुरू आहे. दारव्हा रोड, आर्णी रोड, धामणगाव रोड यासह विविध ठिकाणी बिल्डर मोठे मोठे अपार्टमेंट उभारत आहेत. यासोबतच शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. अनेकांनी अपार्टमेंटच्या ठिकाणी खोदलेले बोअरवेल कोरडे पडले आहे. त्यामुळे ही मंडळी बाहेरुन पाणी आणत आहे. नेमके पाणी कोठून येते हे सर्वश्रृत असले तरी त्यांच्यावर कुणीही कारवाई करीत नाही.
दुष्काळी परिस्थितीत बांधकाम थांबविण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम थांबविता येते, परंतु नगरपरिषदच शहरात रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करीत आहे त्यामुळे बिल्डरांना नोटीस देण्यास नगरपरिषदही पुढाकार घेत नाही. यवतमाळ शहराची भूजल पातळी खालावली आहे. अशा स्थितीत आणखी १५ दिवस पाऊस येण्याची चिन्हे नाही.
निळोणा आटला आहे. चापडोहवर भिस्त आहे. भूगर्भातील पाणी बांधकामावर वापरले तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)

टँकरचे पाणी बांधकामावर पाण्याची उधळपट्टी थांबणार कधी ?
यवतमाळ शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामावर रात्रीच्यावेळी टँकरने पाणी पुरविले जाते. पिण्याचे पाण्याचे कारण पुढे करून टँकर फुकटात भरले जातात. मात्र तेच पाणी दुप्पट दराने बांधकाम व्यावसायिकांना विकले जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या बांधकामावर रात्रीच्या वेळी फेरफटका मारला तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर पाणी ओततांना दिसून येतात.

शहरातील विविध मंगल कार्यालय आणि लॉनवर पाण्याची उधळपट्टी होत आहे. हिरवळ टिकविण्यासाठी हजारो लिटर पाणी झाडांना दिले जात आहे. तर दुसरीकडे त्याच परिसरातील नागरिक मात्र गुंडभर पाण्यासाठी पायपीट करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर राजकीय पाठबळातून टँकर लॉनवर पोहोचत असल्याची माहिती आहे. पाण्याचा हा अपव्यय पाण्याची बचत सांगणारेच करीत असल्याचे दिसत आहे. शहरातील भीषण परिस्थिती बघता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची गरज आहे.

Web Title: Due to severe water scarcity, construction of loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.