गुजरातच्या मिठामुळे काळवंडतेय पोषण आहाराची खिचडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:54 AM2018-08-06T04:54:33+5:302018-08-06T04:55:13+5:30
मागील वर्षी तूरडाळ महागल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला फटका बसला होता.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : मागील वर्षी तूरडाळ महागल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला फटका बसला होता. यंदा तूरडाळीसह तांदळाचीही चंगळ असली, तरी गुजरातच्या मिठामुळे खिचडी काळीकुट्ट होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेतली खिचडी काळी होत असून आता विद्यार्थीही त्याला नाक मुरडत आहेत.
राज्यातील ८६ हजार ४३९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. १ कोटी १२ लाख ८१ हजार ७७२ विद्यार्थ्यांची या योजनेत नोंद आहे. परंतु, केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेत आता गुजरातमधून येणारे ठराविकच मीठ वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. या मिठामुळे प्रत्येक शाळेतली खिचडी काळी होत असल्याने विद्यार्थी ती खाण्यास नकार देत आहेत.
शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आयोडीन, आयर्न मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षण विभागाने गुजरातमध्ये तयार होणारे
‘डबल फोर्टिफाइड’ मीठच वापरण्याचे आदेश दिले आहेत.
‘श्री सॉल्ट’ नावाचे हे मीठ गुजरातमधील चोपाडवा येथील केम फूड प्रा. लि. कंपनीने उत्पादित केलेले आहे.