पिलांचे घरटे बनविण्यासाठी सुगरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 09:09 PM2019-07-13T21:09:11+5:302019-07-13T21:09:41+5:30
निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल्या काटेरी झुडूपांवर मनमोहक नक्षीकाम केलेले घरटे तयार करताना दिसत आहे.
देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल्या काटेरी झुडूपांवर मनमोहक नक्षीकाम केलेले घरटे तयार करताना दिसत आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीला रानावनात फिरताना सुगरण पक्षाची नक्षीकाम केलेली मनमोहक घरटी मानवाला भूरळ घालतात आणि नकळत बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओेळी आठवतात. ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला’ या बालपणी पाठ्यपुस्तकात अभ्यासलेल्या ओळी पाखरांच जगणं सांगतात. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहिणाबार्इंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात, तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच बसवतात. जिथे मानवी रहदारी कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही, अशी झाडे हा पक्षी निवडतो. या एकाच झाडावर त्याची १५ ते २० जणांची वस्ती विसावते. खास आपल्या पिलांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी परिश्रमाने घरटी बनवितात. विशेष म्हणजे हे घरटे गवताच्या पातीपासून बनविली जातात. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. पण फुगीर भागातून अंडी किंवा पिलं कधीही बाहेर पडत नाही. सुगरण हा पक्षी भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार या देशात आढळतो. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीचा सुगरण आणि बाया, अशा तीन प्रकारचे सुगरण पक्षी प्रामुख्याने दिसून येतात. किटक व धान्य सुगरणीचे खाद्य आहे.
असे बनविले जाते घरटे
सुगरण पक्षाच्या घराचा आकार पालथ्या चंबूसारखा असतो. सुरूवातीला फांदीभोवती गवताचे धागे घट्ट विणून मजबूत लोंबता दोर तयार करतात. हा दोर एकट्या माणसाला तुटत नाही. त्याच्या आधारावर घरटे लोंबत ठेवले जाते. नंतर दोराच्या मोकळ्या धाग्यात दुसरे धागे गुंतवून घरटे बांधले जाते. घरटे मधोमध रूंद विणून त्याचे दोन भाग केले जातात. पहिला भाग बंद करून त्याला फुग्यासारखा आकार असतो. याला अंडकक्ष म्हणतात. यातच मादी अंडे घालते. नंतर ती उबविली जातात. दुसरा भाग विणून लांब व रूंद नळीसारखा बनविला जातो. याचे खालचे टोक उघडे असून घरट्यात शिरण्याचे ते दार असते. अंडकक्षाच्या आतील बाजूस चिखलाचे लिपण केलेले असते.
खोप्यावरून होतेयं नराची निवड
सुगरण पक्षी विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर घरटी बांधायला सुरूवात करतात. जून ते सप्टेंबर हा सुगरण पक्षाच्या विणीचा हंगाम मानला जातो. काटेरी झाडावर घरटे तयार करण्याचे काम सुगरण पक्षातील नर करतात. घरट्यासाठी लागणाऱ्या गवताच्या पात्यासाठी तो ५०० ते ६०० वेळा खेपा मारतो. घरट्याचा काही भाग पूर्ण होण्याच्या सुमारास मादीचा थवा तिथे येतो आणि घरट्याच्या बांधणीवरून नराची निवड करतो.