सावधान! उष्णतेचा धोका ६६ आरोग्य केंद्रात विशेष कक्ष
By विशाल सोनटक्के | Published: April 5, 2023 06:57 PM2023-04-05T18:57:15+5:302023-04-05T18:57:37+5:30
वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
यवतमाळ : वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यंदाही वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संंभवत असून नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. येथील जिल्हा नियोजन सभागृहात आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.
वातावरणातील बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, त्यासाठीची आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचा एकभाग म्हणून बुधवारी ही कार्यशाळा घेण्यात आली. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. सचिन दिवेकर व ङॉ. विजय डोंपले यांनी पॉवरपॉईंटद्वारे सादरीकरण केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानामध्ये या विषयाचा २०२१ मध्येच समावेश करण्यात आला आहे. वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या आजारांना समर्थपणे तोंड देता याावे यासाठी सर्व नागरिकांसाठी आणि विशेषत: लहान मुले, स्त्रीया, वृद्ध, आदिवासी आणि परिघावरील जनसमुहासाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाढत्या उष्णतेचा असा करावा सामना
उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संभवतो. चक्कर येणे, सुस्त वाटणे, त्वचा लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी उष्माघाताची लक्षणे आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी, सरबत प्यावे, सैल कपडे घालावे, उन्हात जाताना रुमाल-टोपी, छत्रीचा वापर करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यशाळेला मधुकर मडावी, डॉ. शाहू, डॉ. स्मिता पेठकर, डॉ. निलेश लिचडे आदींसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.