विद्यापीठीय राजकारणामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:00 PM2019-01-13T22:00:59+5:302019-01-13T22:01:20+5:30

भाषा टिकविण्याची जबाबदारी शिक्षक तसेच अभ्यासक्रम मंडळाची आहे. मात्र अभ्यासक्रम मंडळाच्या नेमणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण चालते. या विद्यापीठीय राजकारणामुळेच राज्यातील भाषा शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, अशी टीका प्राचार्य डॉ. रमेश जलतारे यांनी केली.

Due to university politics due to lack of language education | विद्यापीठीय राजकारणामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था

विद्यापीठीय राजकारणामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देसाहित्य संमेलनातील परिसंवादात रोखठोक चर्चा

अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : भाषा टिकविण्याची जबाबदारी शिक्षक तसेच अभ्यासक्रम मंडळाची आहे. मात्र अभ्यासक्रम मंडळाच्या नेमणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण चालते. या विद्यापीठीय राजकारणामुळेच राज्यातील भाषा शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, अशी टीका प्राचार्य डॉ. रमेश जलतारे यांनी केली.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘साहित्यकेंद्री अभ्यासक्रमामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था’ या विषयावर परिसंवाद झाला. यात सर्वच वक्त्यांनी रोखठोक मते मांडली. पांढरकवडा येथील डॉ. जलतारे म्हणाले, भाषेची व्याप्ती साहित्यापेक्षाही मोठी आहे. भाषा ही पाषाण असेल तर वाङमय हे पाषाणशिल्प आहे. भाषा सशक्त असेल तरच साहित्य सशक्त निर्माण होईल. पण विद्यापीठात भाषा शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरविणारे मंडळ नेमतानाच मोठ्या चुका होतात. या मंडळाचे सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जातात. त्यातही एखादा प्रकाशक या सदस्यांना भेटतो. एखादे पुस्तक अभ्यासक्रमात लावण्याचा आग्रह धरतो. तेथे त्यांचाही काहीतरी संवाद होतो आणि तेथूनच मग भाषा शिक्षणात विसंवाद सुरू होतो. त्यामुळे सरकारने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणी डॉ. रमेश जलतारे यांनी नोंदविली.
तर गोव्यातून आलेले प्रा. विनायक बापट म्हणाले, साहित्य केंद्री अभ्यासक्रमामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था होते, हे खरेच आहे. आजही आपली शिक्षण पद्धती वसाहतवादी शिक्षण पद्धतीप्रमाणेच आहे. आपले भाषा शिक्षण केवळ साहित्यकेंद्रीच नव्हे तर परीक्षाकेंद्रीही आहे. विनोबांनी सांगितले की, राज्य बदलल्यावर राज्याचा झेंडा बदलतो. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्वात आधी शिक्षण पद्धती बदलणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. आज भाषेचेही विद्यार्थी उत्तरे पाठ करूनच लिहितात, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. भाषा कशी लिहायचे हे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. पण भाषा कशी बोलायची हे शिकवतच नाही. गोवा विद्यापीठाने मात्र अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल करीत चित्रपट रसग्रहण, मुलाखत घेणे, सूत्रसंचालन करणे आदी विषयांवर स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. तेथील अभ्यासक्रम मंडळाचे सदस्यही निवडणुकीतून निवडले जात नाही.
आज मुलांना घरी भाषा शिक्षणच दिले जात नाही. अन् ज्यांच्याकडून मुलांना मराठी शिकविली जाते, त्यांची भाषा कशी आहे, याबाबत संशय वाटतो. डीएड, बीएड करणारे भावी शिक्षक वर्गात गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांना भाषेचे प्रात्यक्षिक शिक्षणच मिळत नाही. तेच पुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांविषयी आपण गळे काढतो. मात्र या लोकांना मराठी शिकविण्याची आपल्याकडे काही व्यवस्था का नाही, असा सवाल प्रा. प्र. ना. परांजपे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात उपस्थित केला.

हवामान, सरकार अन् अभ्यासक्रम..!
डॉ. दिलीप धोंगडे यांनी ‘यात मला हेतूनिष्ठ प्रमाद दिसतो’ म्हणत परिसंवादाच्या विषयावरच शंक उपस्थित केली. भाषा शिक्षणाची दुरवस्था होण्यास अभ्यासक्रम दोषी नाही. तर आपली अध्यापन पद्धतीच दोषी असल्याचे ते म्हणाले. शेक्सपीयर म्हणायचे, हवामान आणि सरकारविषयी कोणीच चांगले बोलत नाही. पण मी म्हणतो हवामान, सरकार आणि अभ्यासक्रमांविषयी कोणीच चांगले बोलत नाही. साहित्य हेच भाषा शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. असे प्रभावी साहित्य आपल्या पूर्वसूरींनी आपल्यापर्यंत आणून ठेवले आहे. त्यामुळे आपल्याला भाषा शिक्षणाची चिंता करण्याची गरज नाही.

नयनतारा प्रकरणाचा निषेध
अमरावतीचे डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी परिसंवादात बोलण्यापूर्वी नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसी प्रकरणाचा आधी स्पष्ट शब्दात निषेध नोंदवला. त्यानंतरच त्यांनी आपल्या विषयाची मांडणी सुरू केली. ते म्हणाले, एवढ्या विशाल महाराष्ट्रात एकाच प्रकारचे भाषा धोरण राबवून चालत नाही. या राज्यात आदिवासी, गोंड, परधान, कोलाम अशा लोकसंख्याबहुल भागात भाषा शिक्षणाच्या अभ्याक्रमात स्थानिक भाषेला स्थान हवे. मात्र सध्या असलेल्या अभ्यासक्रमातही अनेक अभिनव प्रयोग आहेत. ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचविले पाहिजे. कुमार भारती या पुस्तकात विद्यार्थ्यांना बोलीभाषांची ओळख करून देण्यात आली आहे. युवक भारती पुस्तकातही काठीण्यपातळीनुसार बोलीचा समावेश आहे. वऱ्हाडी, झाडीबोलीचाही त्यात अंतर्भाव आहे. साहित्याशिवाय भाषा शिकवलीच जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन केले.

Web Title: Due to university politics due to lack of language education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.