वाघाने युवकाची शिकार केल्याने गावकरी संतप्त, वन विभागाचे समजून एसडीओंचेच पेटविले वाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 11:02 PM2017-09-16T23:02:00+5:302017-09-16T23:02:09+5:30
वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याने संतप्त जमावाने घटनास्थळी वन विभागाचे समजून चक्क राळेगाव उपविभागीय महसूल अधिका-याचेच वाहन पेटवून दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
राळेगाव (यवतमाळ), दि. 16 - वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याने संतप्त जमावाने घटनास्थळी वन विभागाचे समजून चक्क राळेगाव उपविभागीय महसूल अधिका-याचेच वाहन पेटवून दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार घटनास्थळी दाखल झाले असून प्रचंड पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.
सखी येथील सतीश पांडुरंग कोवे (२२) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सतीश शेतात बैल चारत असताना ही घटना घडली. गेल्या दोन वर्षात राळेगाव तालुक्यात वाघाने सहा जणांचा बळी घेतला. त्यामुळे सखी येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जिल्हाधिकारी व इतरांना माहिती देऊन राळेगावचे उपविभागीय महसूल अधिकारी संदीपकुमार अपार सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास सखी येथे पोहोचले. त्यांचे वाहन येताच गोळा झालेल्या संतप्त जमावाने थेट तोडफोड सुरू केली. यावेळी अपार कसे तरी वाहनाच्या बाहेर पडल्याने अनर्थ टळला.
यानंतर संतप्त जमावाने वाहनाला आग लावली. तत्पूर्वी तोडफोडीत वाहन चालक शेख हाफीज याच्या डोळ्याला काच लागल्याने ते किरकोळ जखम झाले. त्यानंतर चालकानेही वाहनातून सुरक्षित स्थळी सावरखेडकडे धाव घेतली. दरम्यान वन विभागाचे वाहन समजून संतप्त जमावाने एसडीओंच्या वाहनावर रोष व्यक्त केल्याचे सांगितले जाते. खुद्द एसडीओ अपार यांनीही हीच शक्यता वर्तविली. मृताच्या कुटुंंबियांनी व गावक-यांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवू देण्यास पोलिसांना मज्जाव केला. परंतु घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी त्यांच्याशी चर्चा करून समजूत काढली. राळेगाव व त्या भागातील बहुतांश पोलीस ठाण्यांची कुमक सखी- कृष्णापूर गावात पाठविण्यात आली आहे. मुख्यालयातून अतिरिक्त बंदोबस्तही रवाना करण्यात आला. अपर अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी तळ ठोकून आहेत. वृत्तलिहिस्तोवर सखी गावातील तणाव कायम होता.
गावक-यांशी चर्चा केली, मृताच्या कुटुंबियांचीही समजूत काढल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे.
- एम. राज कुमार
जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ