त्वचारोगाने गावेच्या गावे बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:31 PM2018-02-21T22:31:49+5:302018-02-21T22:32:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बोंडअळीपासून वाचलेला कापूस घरात साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता आरोग्याची नवीच समस्या निर्माण झाली आहे. कापसातून संसर्ग होऊन शेतकºयांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील त्वचारोगाची लागण होत आहे.
वणी तालुक्यासह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावे या आजाराने बेजार आहेत. कापसाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर खाज सुटते. त्यानंतर शरीरावर लाल रंगाचे धामे येतात. त्यालाही खाज सुटते. त्यानंतर तेथे जखम तयार होते. औषधोपचारानंतरही किमान आठ दिवस हा आजार बरा होत नाही. अनेकांना तर औषधोपचार घेतल्यानंतरही पुन्हा-पुन्हा या आजाराची लागण होत आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारचा त्वचारोग पाहत असल्याचे अनेक जुन्याजाणत्या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील अनेक शेतांमध्ये अजुनही कापूस वेचणी सुरू आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांनादेखील या आजाराची लागण होत आहे. मजुरी बुडू नये म्हणून जुजबी औषधोपचार घेऊन हे मजूर शेतात कापूस वेचणी करीत आहेत.
गावठी इलाजावर भर
या आजाराने बाधित गावखेड्यातील रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात न जाता स्वत:वर गावठी ईलाज करीत आहेत. पेनकिलर मलम अथवा सर्दीसाठी वापरण्यात येणारा मलम त्वचारोगावर लावत आहेत. मात्र त्यामुळे हा आजार बरा होत नसल्याचा अनुभव रुग्ण घेत आहेत. आरोग्य विभाग मात्र या विषयात अद्यापही अनभिज्ञ आहे.
कापसातील कीटकांपासून आजार
बोंडअळीग्रस्त कापसात मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाचे किटक तयार झाले आहेत. या कीटकांमुळे हा त्वचारोग फैलावत असल्याचे शेतकरी सांगतात. अगदी कापसाच्या ढिगाऱ्याजवळून गेले तरी या आजाराची बाधा होत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. अनेक शेतकऱ्यांनी हा कापूस आपल्या घरात साठवून ठेवला आहे. मात्र या आजाराच्या भीतीपोटी या शेतकऱ्यांनी घरातील कापूस इतरत्र हलविला असल्याची माहिती घोन्सा येथील शेतकरी अनंता काकडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
निंबाळ्यात पाहुण्यांना झाली बाधा
वणी-मारेगाव मार्गावरील निंबाळा येथील एका शेतकऱ्याने भांदेवाडा येथील जगन्नाथबाबा देवस्थानात जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अनेक नातलग निंबाळा येथे सदर शेतकऱ्याच्या घरी अगोदरच्या दिवशीच मुक्कामाला आले. रात्री शेतकºयाच्या घरातच त्यांनी मुक्काम केला. याच घरात कापूस ठेऊन होता. रात्रीतून या सर्व पाहुण्यांच्या अंगाला खाज सुटल्याने हे पाहुणे चांगलेच बेजार झालेत. ही बाब लक्षात आल्यानंतर घरातील कापूस इतरत्र हलविण्यात आला.
त्वचारोगाचे तुरळक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे वणी तालुक्यात या रुग्णांची संख्या कमी असावी असे वाटते. मात्र या आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा तालुका ठिकाणावरील शासकीय रुग्णालयात औषधोपचार उपलब्ध आहेत.
- डॉ.विकास कांबळे,
तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी.