आजंतीत पाणीटंचाईचा रंगतोय राजकीय शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:40 PM2019-05-09T23:40:16+5:302019-05-09T23:40:53+5:30

पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे.

Due to water shortage politics | आजंतीत पाणीटंचाईचा रंगतोय राजकीय शिमगा

आजंतीत पाणीटंचाईचा रंगतोय राजकीय शिमगा

Next
ठळक मुद्देनळ योजनेत मुबलक पाणी : नळ जोडणीसाठी उदासीनता

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे. गावातील विहिरींमध्ये नळ योजनेचे पाणी सोडून पुरवठा केला जात आहे. यावरून आजंतीतील पाणीटंचाई हा केवळ राजकीय शिमगा असल्याचे पुढे आले आहे.
आजंती(खाकी) या गावात दोन किलोमीटर अंतरावर नळ योजनेची विहीर खोदली आहे. विहिरीला लागून मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यातही मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीचे पाणी थेट गावातील विहिरीत सोडले जाते. संभाव्य पाणीटंचाई पाहता येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलस्वराज्य अंतर्गत दोन वर्षांपूर्वीच गावासाठी नळ योजनेची विहीर, पाईपलाईन व टाकीचे काम पूर्ण झाले. मात्र ग्रामस्थांनी नळ जोडणीच घेतली नाही. त्यामुळे या नळ योजनेत काही बिघाड आले आहे. पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी घरोघरी नळ जोडणी घेणे आवश्यक आहे. मात्र अनामत रक्कम भरावी लागत असल्याने कुणी नळ जोडणी घेतली नाही. आता ग्रामपंचायतीने अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी असतानाही येथे राजकीय शिमगा झाल्याने टंचाईचा उहापोह होत आहे.
टँकरमुक्तीचा दावा खोटा
आजंतीतील पाणीटंचाई राजकीय उद्देशाने मांडण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीने हे गाव टँकरमुक्त असल्याचा दावा केला. नऊ हातपंपांपैकी सहा सुरू असल्याचे अहवालात म्हटले. प्रत्यक्षात मात्र गावात आठ हातपंप बंद असून एक हातपंपातून जेमतेम पाणी येते. ४० खासगी विहिरींपैकी चार विहिरींनाच पाणी आहे. सार्वजनिक विहिरीतही एकाही विहिरीला पाणी नाही. टँकरद्वारे किंवा नळ योजनेचे पाणी या विहिरीत सोडले जाते. त्यामुळे सध्याचे पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.

संभाव्य पाणीटंचाईकडे बघून आजंतीमध्ये टँकर लावण्यात आले आहे. येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. गाव टँकरमुक्त असल्याचा अहवाल कुणालाच दिला नाही.
- राजेंद्र राणे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

नळ योजनेच्या विहिरीतून गावातील विहिरींमध्ये पाणी सोडले आहे. त्यातून ग्रामस्थ पाण्याची उचल करतात. नळ जोडणी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गैरसोय टाळण्यासाठी टँकर लावले.
- युवराज मेहत्रे, गटविकास अधिकारी, नेर

गावात मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीतही पाणीसाठा आहे. गावातील काही विघ्नसंतोषी पाण्याचे राजकारण करून बदनामी करत आहे. याऐवजी ग्रामस्थांनी नळ कनेक्शन घेण्याची गरज आहे.
- भाग्यश्री गणेश राठोड,
सरपंच, आजंती(खाकी)

 

Web Title: Due to water shortage politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.