अभ्यागत मंडळातही गाजली पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 09:57 PM2018-05-14T21:57:06+5:302018-05-14T21:57:06+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. महाविद्यालयातील रुग्णसेवा पाण्याअभावी खंडित होऊ नये यासाठी अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. महाविद्यालयातील रुग्णसेवा पाण्याअभावी खंडित होऊ नये यासाठी अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याअभावी काही दिवस शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. भीषण टंचाईमुळे आजही पुरेसे पाणी वॉर्डात पोहोचत नाही. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कसाबसा मेडिकलचा कारभार सुरू आहे. या टंचाईच्या काळात सर्वांनीच वैयक्तिकस्तरावर मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी केले आहे.
या बैठकीत अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांनी पाणीटंचाईची भीषणता मंडळ सदस्यांपुढे मांडली. यावेळी सदस्य प्रवीण प्रजापती यांनी २४ हजार लिटर पाण्याच्या नियोजनाबाबत प्रयत्न करण्याची हमी घेतली. १२-१२ हजार लिटर दोन टँकर महाविद्यालयाला देण्यात येईल असे सांगण्यात आले. सध्या येथील होस्टेलमध्ये सुपर स्पेशालिटीच्या बोअरवरून पाणीपुरवठा सुरू असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले. पाणी पुरवठ्यासाठी निधीची कमतरता असून याकरिता सामाजिक दायित्व म्हणून येथे कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे असेही आवाहन करण्यात आले.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे, वीज वितरण कंपनीशी निगडित कामे विशेष करून एक्सप्रेस फिडरवरून अखंडित वीज पुरवठ्याचा मुद्दा चर्चेला आला. अनेक वर्षापासून एक्सप्रेस फिडरचे काम केवळ चर्चेपुरतेच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले. अजूनही अखंडित वीजपुरवठ्या मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. याबाबत तातडीने उपाययोजनेचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. बर्न वॉर्डमध्ये एसी लावण्याबाबतचा प्रस्ताव मागील बैठकीत ठेवला होता. त्याप्रमाणे या वॉर्डात एसी बसविण्यात आल्याचे अधिष्ठातांनी बैठकीत सांगितले. बैठकीला जिल्हा परिषद आरोग्य सभापती नंदनी दरणे, नितीन भुतडा, अमोल ढोणे आदींसह सदस्य उपस्थित होते.