‘झिरो’ऐवजी ‘ओ’ दाबल्याने यवतमाळ जिल्ह्यातील तुरीचे चुकारे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:05 PM2018-04-26T19:05:09+5:302018-04-26T19:05:21+5:30
शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे चुकारे जमा करताना संगणक आॅपरेटरने झिरोऐवजी ओचे बटन दाबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न होता ते परत गेले.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पारदर्शक आणि गतीमान कारभारासाठी आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. मात्र ही प्रणाली अप्रशिक्षित माणसांच्या हाती गेली की काय होते, याचा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे चुकारे जमा करताना संगणक आॅपरेटरने झिरोऐवजी ओचे बटन दाबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न होता ते परत गेले.
राज्यभरातील तूर खरेदीची माहिती गोळा करणारे मुंबईचे आयटी हब सेंटर काही दिवसांपूर्वी जळाले. यात महत्त्वाचा डाटा प्रभावित झाला. त्यामुळे काही दिवसांपासून आॅनलाईन यंत्रणा ठप्प पडली होती. तुरीच्या चुकाऱ्याची रक्कमही यात अडकली होती. आता हा गोंधळ सुटण्यास प्रारंभ झाला. असे असताना अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे नवा गोंधळ पुन्हा उभा झाला आहे. बाभूळगाव येथील तूर खरेदी केंद्रावर संगणकावर झिरोऐवजी ओ दाबल्याने तुरीचे चुकारे परत गेले. शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकातील शून्य टाईप करताना शून्य टाईप करण्याऐवजी ओ असे टाईप केल्याने ते खाते क्रमांक पडताळणीत चुकीचे दाखवले गेले व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. राळेगावातही असाच प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत तूर विकली होती. त्याचे पैसे एप्रिलमध्ये आले. परंतु संगणकचालकाच्या अज्ञानाने तेही परत गेले. पैसे परत का गेले, याची माहिती बाभूळगाव व राळेगाव केंद्राला कळत नव्हती. आयटी विभागाने सोमवारी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर पैसे का जमा झाले नाही, याची माहिती घेतली तेव्हा हा घोळ पुढे आला. आता पैसे मिळण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कर्जमाफीला बसला होता स्पेसचा फटका
शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीला संगणकाच्या स्पेसचा फटका बसला होता. जिल्हा बँकेला कर्जाचा निधी ब्रँचकडे वळता करताना नंबरमध्ये एक स्पेस अधिक सुटली. या छोट्याशा चुकीने शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम परत गेली होती. ही रक्कम मिळविण्यासाठी आयटी विभागाकडे संपर्क साधावा लागला. हा अनुभव पाठीशी असतानाही तूर चुकाऱ्यातही हीच परिस्थिती निर्माण झाली.