‘पीएचसी’च्या कामात खोडा
By admin | Published: January 22, 2015 02:17 AM2015-01-22T02:17:03+5:302015-01-22T02:17:03+5:30
तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरातील दहा ते बारा गावातील रुग्णांसाठी परिसरात कोणतीही सुविधा नसल्यामुळे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ब्राह्मणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
राजाभाऊ बेदरकर उमरखेड
तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरातील दहा ते बारा गावातील रुग्णांसाठी परिसरात कोणतीही सुविधा नसल्यामुळे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ब्राह्मणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. परंतु यासाठी लागणाऱ्या जागेचे प्रमाणपत्र देण्यासाठी वनविभागाकडून तब्बल तीन महिन्यांपासून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले आहे.
ब्राह्मणगाव येथे मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेसंदर्भात विविध विभागाकडून सदर जागा आरक्षित आहे किंवा कसे याबाबत संबंधित विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी मागील तीन महिन्यांपासून ब्राह्मणगाव ग्रामपंचायतकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. परंतु उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने जागा मंजूरीबाबतचे काम रखडले गेले आहे. त्यामुळे ब्राह्मणगावसह परिसरातील दहा ते बारा गावातील शेकडो रुग्णांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करून तालुक्याच्या ठिकाणी उपचारार्थ जावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होवूनही केवळ वनविभागाच्या आतताई पणाच्या भूमिकेमुळे रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. दहा ते बारा गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी शासनाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. यासाठी ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाच हजार ७३९ क्षेत्रफळ चौरस मिटरची जागा राखीव करण्यात आली आहे. ही जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे त्रुटीच्या पूर्ततेसाठी सदर प्रकरण उमरखेड तहसील कार्यालयाकडे परत पाठविले. यात त्रुटीची पूर्तता होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड, सहायक विद्युत अभियंता उमरखेड, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड या सर्व विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात आले होते.
इतर सर्व विभागांनी सार्वजनिक आरोग्य सुविधेच्या कामाला तत्परता दाखवून तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र विनाविलंब देण्याचे आपले कर्तव्य पार पाडले. परंतु वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मात्र यामध्ये खोडा निर्माण केला आहे. सदर प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगून त्यांनी सदर प्रकरण उपवनसंरक्षक अधिकारी पुसद यांच्याकडे असल्याची टोलवाटोलवी केली. त्यावरून उमरखेड तहसील कार्यालयाने उपवनसंरक्षक अधिकारी पुसद यांच्याकडे पत्रव्यवहार केला असता त्यांनी शासन निर्णयानुसार हे प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक कामासाठी व आरोग्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास तब्बल तीन महिन्यांपासून टाळाटाळ करून सार्वजनिक कामामध्ये खोडा निर्माण करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना असे करण्यामध्ये काय स्वारस्य आहे, हा प्रश्न ब्राह्मणगावचे सरपंच गुलाबराव पठाण यांनी केला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांना समज देवून सार्वजनिक कामातील अडथळा दूर करावा अशी मागणी ब्राह्मणगाव येथील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते उपलब्ध होवू शकले नाही. (प्रतिनिधी)