स्मार्ट कार्ड नोंदणीत लिंक फेलचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:38 PM2019-07-17T21:38:08+5:302019-07-17T21:38:36+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप सहन करत थांबावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप सहन करत थांबावे लागत आहे.
१३ जूनला ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर १४ जूनच्या सकाळपासून वणीच्या आगारात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठांची प्रचंड गर्दी उसळली. ती आजही कायम आहे. यासाठी वणीच्या एस.टी.आगारात एका टेबलवर केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने या कर्मचाºयावर नोंदणीसाठी प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी बराच विलंबही होत असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. याठिकाणी आणखी दोन टेबल सुरू केल्यास कामाचा खोळंबा होणार नाही. असे असले तरी अद्याप वणी आगाराकडून त्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. अलिकडेच वणीतील दोन सेतू केंद्रांनादेखील स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी ज्येष्ठांकडून ७० रूपये घ्यावे, असे आदेश असताना या सेतूंमधून १०० रूपये घेतले जात असल्याचा ज्येष्ठांचा आरोप आहे. ही लुट थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
वणी आगारात आतापर्यंत एक हजार ४४७ स्मार्ट कार्ड तयार झाले आहे. मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी ते अद्यापही नेलेले नाहीत. त्यामुळे आगाराला हे कार्ड सांभाळून ठेवावे लागत आहे. त्यातच गेल्या पाच-सहा दिवसांपासून वणी एस.टी.आगारात लिंक फेलची समस्या गंभीर बनली आहे. ही समस्या सुटल्यास दररोज ६० ते ७० कार्ड बनविले जाऊ शकतात. सकाळपासून नोंदणीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लिंक फेल झाल्याचे कळताच तासनतास एस.टी.आगाराच्या कार्यालयासमोर ताटकळत राहावे लागते.
मोबाईलची समस्या
स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांजवळ स्वत:चा आधुनिक मोबाईलच नसतो. नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर ओटीपी नंबर येतो. तो नंबर सांगितल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र अनेकांजवळ मोबाईलच नसल्याने नोंदणीत बाधा येत आहे.